आज होणार महायुतीच्या कल्याणमधील बंडखोरांचा फैसला

आज होणार महायुतीच्या कल्याणमधील  बंडखोरांचा फैसला

कल्याण (प्रतिनिधी) :
शिवसेना-भाजप महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरांचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. त्यातही कल्याणमधील बंडखोरीचा महायुतीला फटका बसण्याची चिन्हे असल्याने ती अधिक त्रासदायक ठरणारी आहे. येथील तीन मतदारसंघापैकी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात सेनेला यश आल्याने उर्वरित दोन मतदारसंघातील बंडखोरांच्या माघारीबाबत आज कोणता फैसला होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कल्याण पश्चिममधील विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांची दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी असतानाही सेनेच्या दबावतंत्रामुळे हा मतदारसंघ भाजपने सेनेला देऊन टाकला. आता येथून सेनेचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अपक्ष तसेच पक्षाच्या नावाने देखील उमेदवारी दाखल करीत बंडखोरीचा पवित्रा घेतला. त्यांच्या उमेदवारीमुळे सेनेच्या भोईरांना फटका बसणार आहे. 

कल्याण पूर्व मतदारसंघात दोन वेळा अपक्ष निवडणून आलेले आमदार गणपत गायकवाड यांना मागील वेळेस युती नसताना सेनेच्या गोपाळ लांडगे यांनी पुरते जेरीस आणले होते. मधल्या काळात भाजपच्या जवळ गेलेल्या गायकवाड यांनी यावेळी विजय सुकर व्हावा म्हणून भाजपमध्ये प्रवेश करीत पक्षाची उमेदवारी देखील मिळवली. मात्र येथून शिवसेनेचे प्रबळ दावेदार धनंजय बोडारे यांनी देखील अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडखोरी केली. त्यांना कल्याण पूर्वेतील बहुसंख्य सेना नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निर्णया विरोधात जात पाठिबा दिल्याने भाजपच्या छावणीत चिंतेचे वातावरण पसरले. 

कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना आधीच उमेदवारी जाहीर करीत एबी फोर्म देखील दिला होता. मात्र ऐनवेळी सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या आग्रहावरून डोंबिवली येथील ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली. मात्र भोईरांनी देखील पक्षांच्या नावाने उमेदवारी दाखल करीत बंडखोरी करण्याचा पवित्रा घेतला. या तीन मतदारसंघातील बंडखोरी तापदायक ठरणार असल्याने महायुतीला त्याचा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे सांगत गर्भित इशारा दिला आहे.

अखेरीस सुभाष भोईर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुखांची भेट घेत माघार घेतल्याचे जाहीर केले. मात्र पश्चिममधील भाजपचे पवार आणि पूर्वेतील सेनेचे बोडारे यांनी रविवारी रात्री उशिरापर्यत माघार न घेतल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत काय फैसला होणार ते आज (सोमवार) दुपारपर्यंत स्पष्ट होईल.