कल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर 

कल्याणमध्ये नाल्यातील भरावाची आपने केलेली पाहणी सोशल मिडीयावर 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण शहरातील सांडपाणी खाडीमध्ये वाहून नेणाऱ्या जरीमरी नाल्यावर गोविंदवाडी बायपास जोडरस्त्यालगत नाल्यावर पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. तेथील कंत्राटदाराने नाल्यात दगडमातीचा मोठा भराव टाकला आहे. पावसाळा सुरु असल्याने अतिवृष्टीमुळे नाल्यातील सांडपाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा उत्पन्न होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तेथील नाल्यात उतरून पाहणी करीत तेथील परिस्थितीचे सोशल मिडीयावर लाईव्ह करीत महापालिका प्रशासनाची अनास्था कल्याणकरांच्या नजरेस आणली. तद्नंतर यासंदर्भात महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जरीमरी नाला हा कल्याणच्या पूर्व-पश्चिमेतील नाल्यांना पश्चिमेत रेल्वेमार्गालागत जोडला गेला आहे. त्यामुळे हा नाला महत्वाचा मनाला जातो. हे नाले सर्वोदय गार्डन येथून कल्याण शिळ रस्त्यावरील गोविंदवाडी बायपास जोडरस्त्याच्या बाजूने कल्याणच्या खाडीला जाऊन मिळतो. गोविंदवाडी बायपास जोडरस्त्याच्या  ठिकाणी नाल्यावरील पुलाची रुंदी वाढविण्याचे काम चालू आहे. सदर पुलाच्या कामासाठी सबंधित कंत्राटदाराने या नाल्यातच दगडमातीचा मोठा भराव टाकला आहे. दोन दिवसापूर्वी हा भराव नाल्यातच बाजूला हटवला असला तरी तेथे अद्याप सुमारे १० फुट रुंद व १०० मीटर लांबीचा भराव तसाच आहे. या परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास नाल्यातील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा होण्याची शक्यता आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. याप्रसंगी अतिवृष्टी झाल्यास भरावामुळे नाल्यातील सांडपाणी आजूबाजूच्या लोकवस्तीत शिरून जीवित व वित्तहानी होण्याची भीती जोगदंड यांनी शहराच्या पूर्व-पश्चिमेतील सखल भागांला त्याचा फटका बसण्याची भिती व्यक्त केली.

सदर पाहणीनंतर आपचे पश्चिम विधानसभेचे शब्बीर हुसेन, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष राजू पांडे, सचिव उमेश कांबळे, कल्याण पूर्व विधानसभा उपाध्यक्ष राजेश शेलार, सुरज मिश्रा आदी पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे उपायुक्त धनाजी तोरस्कर व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेत नाल्यातील भराव व रस्त्यावरील बांधकामाचे साहित्य येत्या दोन दिवसात हटविण्याची मागणी केली. अतिवृष्टी होऊन नाल्यातील भरावामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास त्याला सबंधित कंत्राटदार व महापालिकेचे सबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, एकीकडे नालेसफाई शहरात सुरु असताना येथील भरावाकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे ही आश्चर्याची व तितकीच धक्कादायक बाब असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.