‘गाव तसं चांगलं पण... नेटवर्कसाठी वेशीला टांगलं!’

‘गाव तसं चांगलं पण... नेटवर्कसाठी वेशीला टांगलं!’

चोरवणे (संभाजी मोरे) : ‘जग चाललं आहे चंद्रावर’ या उक्तीप्रमाणे आपला देशही प्रगती करीत आहे. संगणकाच्या युगात मोबाईल घराघरात पोहोचले आहे. मोबाईल कंपन्यांचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. मात्र खेड तालुक्यातील चोरवणे गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने गावाच्या वेशीबाहेर येऊन झाडाला टांगल्याप्रमाणे हातात वर मोबाईलचे नेटवर्क शोधावे लागत आहे. त्यामुळे चोरवणे गावासाठी आता ‘गाव तसं चांगलं पण... नेटवर्कसाठी वेशीला टांगलं!’ हा नवा वाक्प्रचार रूढ होऊ लागला आहे.

मोबाईलच्या युग असल्याने कोरोनामुळे गेल्या वर्षभरात कोविड-१९ च्या प्रसारामुळे संपूर्ण देशात नागरिकांना घरातून व आता आपल्या भागातूनच आपला काम धंदा करावा लागत आहे. दुसरीकडे शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि युवकवर्गाला ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु चोरवणे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना रोजगार आणि ऑनलाईन शिक्षणापासून मोबाईल नेटवर्क नसल्याने वंचित राहावे लागत आहे. परिणामी रोजगाराअभावी एकीकडे उपासमार तर दुसरीकडे शिक्षणाचा बट्ट्याबोळ अशा दुहेरी संकटाला चोरवणेवासियांना तोंड द्यावे लागत आहे.

चोरवणे निवे आणि परिसरातील शालेय मुलांना अभ्यास तसेच लॉक डाऊन काळात गावी अडकलेल्या चाकरमान्यांना आपला काम धंदा ऑनलाईन करण्यासाठी बाजूच्या गावात सीमेवर ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क येईल त्याच ठिकाणी झाडाला लटकलेल्या प्रमाणे आपला मोबाईल तासनतास हातात घेऊन अभ्यास तसेच कामाचा बोजवारा करावा लागला व आज पर्यंत ही अनेक लोक वेशीबाहेर लटकल्या याप्रमाणे नेटवरच्या शोधात रस्ते आणि गवता मधून झाडाझुडपात फिरताना दिसत आहेत. तरीही जिल्हा प्रशासनाला किंवा कोणत्याही मोबाईल कंपनीला या ग्रामस्थांची दया येताना दिसत नाही चोरवणे नीवे ग्रामस्थांनी गावात मोबाईल नेटवर्क मिळावे, यासाठी सातत्याने विविध मोबाईल कंपन्यांकडे पाठपुरावा करूनही आजपर्यंत गावात नव्याने मोबाईल टावर उभारण्याच्या दृष्टीने सुरुवात झालेली दिसत नाही.

चोरवणे गाव हे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले स्वयंभू श्री नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याजवळ असून संपूर्ण परिसर निसर्गरम्य आनंदमय आहे. नागेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात. परंतु चोरवणे गावामध्ये मोबाईलचे नेटवर्क नसल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, तसेच पर्यटकांनाही संपर्काच्या दृष्टीने त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अनेक शालेय मुलांचे खूप नुकसान झालेले आहे नोकरीधंद्यासाठी साठ साठ किलोमीटर रोज ये-जा करावी लागते. ‘अजून किती वर्ष मोबाइल नेटवर्कची चोरवणे ग्रामस्थांनी वाट पाहायची. नेटवर्कसाठी गावाच्या वेशीबाहेरच उभे राहायचे का, असे सवाल करीत येथील ग्रामस्थ रवींद्र गंगाराम उतेकर यांनी प्रशासनाच्या विरोधात आपला राग व्यक्त केला आहे.