...तर संभाजी ब्रिगेड गिरीश कुबेर यांचे लसीकरण करणार !

...तर संभाजी ब्रिगेड गिरीश कुबेर यांचे लसीकरण करणार !

मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकार गिरिश कुबेर यांच्या रीनैसंस द स्टेट या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी करतानाच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड गिरीश कुबेर यांचे लसीकरण करील, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे. 

आखरे यांनी सोशल मिडीयावर जारी केलेल्या भूमिकेत, गिरिश कुबेर नामक लेखकाने छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण Renaissance State:The Unwritten story of the Making of Maharastra या पुस्तकामध्ये   केले असून यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

छ. संभाजी महाराजांच्या विरोधात अनाजीपंत यांनी ज्या पध्दतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच पध्दतीने छ. संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याच काम आजही कथा, कांदबर्या, मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही. या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे. आम्हा सगळ्या इतिहास संशोधक - अभ्यासकांच्या भावना दुखावल्या गेल्या गेल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी, तसेच बाजारत विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाने जप्त करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. ते अभ्यासून प्रकटतात असेही बोलले जाते. ते छ. संभाजी महाराजांविषयी आज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे या त्यांच्या पुस्तकात छ. संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी करतानाच संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.