... यापुढे दहीहंडी चार थरांचीच !

... यापुढे दहीहंडी चार थरांचीच !

नुकताच दहीहंडी उत्सव  साजरा करण्यात आला. कोकणासह सांगली कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही उत्सवात जल्लोष असणे शक्यच नव्हते. परिणामी दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने व कोणताही गाजावाजा न करता एक सोपस्कार म्हणून साजरा केला गेला. सर्व उत्सवप्रिय व्यक्तीनी संवेदनशीलता दाखवत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला, ही महाराष्ट्राच्या सभ्यतेला उजाळा देणारी महत्त्वपूर्ण बाब आहे.

टिटवाळा येथील संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने देखील दरवर्षी शहरातील प्रतिष्ठेचा दहीहंडी उत्सव आयोजित केला जातो. यंदा दहीहंडी उत्सवा दरम्यानच या संकल्प प्रतिष्ठानचे प्रमुख विजय देशेकर यांना त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्याने ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशेकर हेही आपल्या कुटुंबीयांसह रुग्णालयात वडिलांसोबत होते. दहीहंडीच्या दिवशी रुग्णालयात असताना देशेकर यांना उंच थरावरून पडून जखमी झालेले अनेक गोविंदाना रुग्णालयात आणलेले पाहायला मिळाले. त्यांची अवस्था पाहून त्यांना फार वाईट वाटले. तेथील टीव्ही वरदेखील विविध जिल्ह्यांमध्ये जखमी झालेल्या गोविंदाच्या बातम्या बघायला मिळाल्या.

याचवेळी देशेकर यांना दुसर्‍या रुग्णालयात जावे लागले तेथेही आलेल्या काही जखमी गोविंदाना पाहिल्या नंतर मात्र देशेकरांचे मन विचार करू लागले. आणि बालकांचा तरुणाईचा जीव धोक्यात घालून मिळणारा उत्सवाचा आनंद 'त्या' गोविंदाच्या जीवनात मात्र अंधार आणू शकतो याची त्यांना प्रखरतेने जाणीव झाली. याच संदर्भातील न्यायालयात चाललेल्या प्रकरणाची देखील त्यांना आठवण झाली. आणि त्यांनी निर्णय घेतला की, यापुढे संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी चार थरांचीच ठेवायची. अन्य संस्था मंडळांना देखील कमी थरांची हंडी उभारण्याचा आग्रह धरायचा! रुग्णालयात पाहिलेल्या जखमी गोविंदाची स्थिती पाहून देशेकर यांनी एक चांगला, कौतुकास्पद निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे सर्व थरातून स्वागत झाले पाहिजे व इतर मंडळांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे!