तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटी’ने घेतली ठाणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची माहिती

तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटी’ने घेतली ठाणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची माहिती

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबतची सविस्तर माहिती शनिवारी तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटीच्या टीमने घेतली. यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली.

ठाणे स्मार्ट सिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटीची एक टीम ठाण्यात दाखल झाली आहे. शनिवारी महापालिका भवन येथे या टीम समोर ठाणे स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक विष्णू वेणुगोपाल, ठाणे स्मार्ट सिटीचे नोडल अधिकारी सुधीर गायकवाड तसेच इतर अधिकारी आदी उपस्थित होते.

शहरात स्मार्ट सिटीच्यावतीने राबविण्यात येणारे नवीन रेल्वे स्टेशन, मेट्रो  रेल्वे, सॅटीस(ठाणे पूर्व), वॉटर फ्रंट, एकात्मिक पाणीपुरवठा करण्यासाठी स्मार्ट मीटर योजना, डीजी ठाणे डिजिटल प्रणाली, तलावांचे सुशोभिकरण, आर्कषक एलईडी लाईट्स, जेष्ठासाठी विरंगुळा केंद्र, काम करणाऱ्या महिलासाठी वसतिगृह, बहुमजली पार्किंग सुविधा, बहुस्तरीय वाहतूक सुविधा, पादचारी  पूल, क्रीडा सुविधा, सायकल लेन, भुयारी गटारे  तसेच मलनिःसारण आदी प्रकल्पाबाबत स्मार्ट सिटी लिमिटेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटीच्या टीमला माहिती दिली.
 
ठाणे महापालिकेने शहरात सीसीटीव्हीचे जाळे देखील उभारण्यात आले आहे. ठाणे शहरातील प्रमुख चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ट्राफिक इम्प्रुव्हमेंट्स स्कीम देखील पालिकेने तयार केली आहे. संपूर्ण ठाणे शहरात मोफत वाय फाय सुविधा देण्यात आली आहे. सोलर रुफटॉप, अर्बन रेस्ट रूम, ऑनलाईन परर्फोर्मन्स  मॉनिटरिंग आदी प्रकल्पदेखील सुरु करण्यात आले आहेत. या सर्व महत्वकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटीच्या टीम समोर करण्यात आले.
 
दरम्यान, हाजुरी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे प्रत्यक्ष भेट देऊन या सर्व प्रकल्पातील तंत्रज्ञानाची माहिती तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटीच्या टीमला देण्यात आली. यामध्ये अदययावत नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील सीसीटीव्हीचे नियंत्रण केले जाते. तसेच कोविड-१९ च्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी अद्ययावत मध्यवर्ती कोविड वॉर रुम कार्यान्व‍ित करण्यात आली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातील बेडची उपलब्धता याबाबत तात्काळ माहिती उपलब्ध होवून त्यांना आवश्यक ती मदत दिली जात होती. २४ तास या सेंट्रल वॉर रुमच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पध्दतीचे काम होत असून या सर्व कामाचे तिरुवनन्तपुरम स्मार्ट सिटीच्या टीमने कौतुक केले.