... ही तर मनसेच्या आमदारांची जुनी खोड- आ. विश्वनाथ भोईर

... ही तर मनसेच्या आमदारांची जुनी खोड- आ. विश्वनाथ भोईर

कल्याण (प्रतिनिधी) : मोहने येथील वडवली व वालधुनी पुलाचे महापालिकेकडून करण्यात येणारे लोकार्पण पुढे ढकलण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. संदर्भात शिवसेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे लोकार्पण करीत ‘स्टंट’ करण्याची मनसेचे आमदार राजु पाटील यांची जुनीच खोड असल्याची टीका केली. येत्या दोन-तीन दिवसात वडवली उड्डाणपुलाचे अधिकृतपणे लोकार्पण करण्यात येईल, असेही आ. भोईर यांनी स्पष्ट केले.

मनसेने सोमवारी केलेल्या वडवली उड्डाणपुलाउद्घाटनाबाबत शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी कल्याण पश्चिमेचे स्थानिक आमदार तथा कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भोईर यांनी सांगितले की, सोमवारी दोन्ही पुलांचे उद्घाटन करण्याचे ठरले होते. काही तांत्रिक अडचणी व कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता पालकमंत्री आल्यानंतर होणारी तुफान गर्दी टाळण्यासाठी उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. तसे निमंत्रितांना कळविण्यातही आले. तरी सोमवारी सायंकाळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या नेहेमीच्या सवयी-खोडीनुसार दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे, उद्घाटन करायचे,  निदर्शने करायची काहीतरी ‘स्टंट’ करायचे जेणेकरून लोकांचे आपल्याकडे लक्ष जाईल. परंतु लोक समजदार आहेत. हा पूल पूर्ण होण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य असल्याची त्यांना माहिती असल्याचे आमदार म्हणाले. 

... पूल रद्द करावा लागला असता

पालकमंत्री नसते तर पुलासाठी जागा मिळाली नसती. एखादे वेळेस पूल रद्द करावा लागला असता. परंतु सर्व प्रयत्न करून पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. उद्घाटन पुढे ढकलल्याचे निरोप देऊनसुद्धा आ. पाटील यांनी सवयीनुसार ‘आयत्या बिळावर नागोबा’ याप्रमाणे वडवली पुलाचे उद्घाटन केल्याची टीका आमदार भोईर यांनी केली.

दोन-तीन दिवसात पुलांचे लोकार्पण

मनसेने केलेले वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन अनधिकृत असून येत्या दोन-तीन दिवसात दोन्ही पुलांचे अधिकृतपणे लोकार्पण करण्यात येईल अशी माहितीही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.