शनिवारी हजारो शिवसैनिक मलंगगडावर कूच करणार

शनिवारी हजारो शिवसैनिक मलंगगडावर कूच करणार

कल्याण (प्रतिनिधी) : 
‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत माघ शुद्ध पौर्णिमेला शनिवारी ८ फेब्रुवारीला हजारो शिवसैनिक मलंगगडावर जाऊन मलंगबाबाच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख तथा आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, दीपक सोनाळकर, रविंद्र कपोते, सचिन बासरे, जयवंत भोईर, गणेश जाधव, विद्याधर भोईर, दिनेश देशमुख, किरण जोगळेकर आदी उपस्थित होते. यावर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला शनिवारी ८ फेब्रुवारीला शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नगरविकास मंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने मलंग गडावर हजारो हिंदू भाविक जाणार असून पूजा करणार असल्याची माहिती शहरप्रमुख आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. 

मलंगगडावरील मच्छींद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. मच्छींद्रनाथांनी याच ठिकाणी अमरनाथांना दीक्षा दिल्याची आख्यायिका आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला मलंगबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येथे येत असतात. मात्र कांही वर्षांपासून मलंगगडावर मुस्लीम समाजाने हे स्थान हाजी मलंग असल्याचा दावा केला आहे. तसेच याठिकाणी अनधिकृत बांधकामही केले आहे. याविरुद्ध हिंदू भाविकानी हरकत घेऊन याविरुद्ध आंदोलन सुरु केले. धर्मादय आयुक्तानी हे  हिंदू स्थळ असल्याचे मान्य केले. मात्र मुस्लिम समाज वक्फ बोर्डाचा हवाला देऊन हा दर्गा असल्याचे सांगत आहे. एकूणच सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले असून गेली ३७ वर्षे ही परंपरा अखंड सुरु आहे. कल्याण शहरापासून ११ कि.मी. अंतरावर अंबरनाथ तालुक्यात मलंगगड आहे.