राज्यात लागणार साडेतीन लाख 'आठवणींची झाडे'

राज्यात लागणार साडेतीन लाख 'आठवणींची झाडे'

मुंबई (प्रतिनिधी) : 
राज्यात रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगरविकास आणि ग्रामविकास विभागामार्फत "वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना" या नावाने राबविला जातो. या अंतर्गत मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्यात येतात. ३३ कोटी वृक्षलागवडीत यावर्षी अशी  ३ लाख ४८ हजार ८८७ 'आठवणींची  झाडे' लागणार आहेत.

जन्म, मृत्यू, विवाह, वाढदिवस, परीक्षेतील यश, नोकरीचा पहिला दिवस, सासरी जाणाऱ्या लेकीची आठवण, दुर्दैवाने घरातील जिवलगाचा झालेला मृत्यू अशा विविध सुख-दु:खाच्या प्रसंगाच्या निमित्ताने  खेड तालुक्यातील रानमळा या गावात वृक्ष लावले जातात. गावात वर्षभर घडणाऱ्या अशा घटनांची माहिती घेऊन संबंधितांना ५ जूनला जागतिक पर्यावरणदिनी वृक्षदिंडी काढून ग्रामपंचायतीमार्फत रोपांचे वाटप केले जाते. या उपक्रमातून आज रानमळा हे गाव हिरवेगार झाले आहे. वृक्ष लागवडीचा हाच पॅटर्न वन विभागाने राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने केलेल्या नियोजनानुसार ग्रामविकास आणि नगरविकास विभागाने यासाठीचे शासन निर्णय निर्गमित केले. आता ३३ कोटी वृक्षलागवडीत ही आठवणींची झाडे लावली जातील. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात अशा रोपांची लागवड होणार आहे.

माणसाचं मन खूप हळवं असतं. मनाच्या कोपऱ्यात अनेक आठवणी साठवून ठेवलेल्या असतात. पण त्याच आठवणी जर वृक्षरुपाने जिवंत राहिल्या तर पर्यावरण रक्षण तर होतेच पण गाव-शहरामधली वनराई वाढून हरित महाराष्ट्राची वाटचाल देखील सोपी होण्यास मदत होते. आठवणीची रोपटी जेव्हा वृक्ष होऊन डोलतात तेव्हा हा स्मृतिगंध अधिकच गहिरा होत जातो, आयुष्यभर दरवळत राहतो. यातून हरित आणि समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल सोपी आणि वेगवान होण्यास मदत होते हीच भावना लक्षात घेऊन वन विभागाने "वृक्षाची उपासना हीच निसर्गाची उपासना" हा उपक्रम राबविला असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात. गावात जन्माला येणाऱ्या बालकाचे स्वागत त्याच्या कुटुंबियांनी रोपटं लावून केले, तर बाळ जसजसे वाढेल तसतसे ते झाडही वाढत जाईल. 

गावात होणाऱ्या विवाहाप्रसंगी "शुभमंगल" वृक्ष लावला तर नवदाम्पत्याच्या नव्या आयुष्यासाठी सुरक्षित पर्यावरण मिळेल. दहावी-बारावी पास होणारे, नोकरी मिळाली म्हणून आनंद व्यक्त करणारे लोक "आनंद वृक्ष" लावून आपला आनंद द्विगुणित करतील. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीच्या हातानं अंगणात "माहेरची झाडी" लावून घेतली तर तिच्या अस्तित्वाचा आणि आठवणींचा मोहोर घरभर दरवळत राहील, ती सासरी सुखी असल्याचा सांगावाही तिच्या नावाने लावलेली माहेरची झाडी सांगत राहील. दुर्देवाने घरातलं जीवाभावाचं माणूस हरवलं तर त्याच्या नावाने लावलेला "स्मृती" वृक्ष त्याची आठवण जोपासत राहील. थोडक्यात आठवण सुखाची असो की दु:खाची ती वृक्षलागवडीच्या माध्यमातून चैतन्यमयी स्वरूपात जिवंत ठेवण्याचं काम या योजनेतून होईल. शिवाय यातून उत्पन्नवृद्धी होईल ते वेगळं, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.