कल्याणात दरोडा टाकणाऱ्या तिघांना अहमदनगर येथून अटक!

कल्याणात दरोडा टाकणाऱ्या तिघांना अहमदनगर येथून अटक!

टिटवाळा (प्रतिनिधी) : अहमदनगरहून कल्याणात येऊन सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या, लुटालूट करणाऱ्या सुमारे दहा जणांच्या टोळीतील तिघा दरोडेखोरांना कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिताफीने तपास करून अहमदनगर येथून अटक केली आहे. 

काही दिवसांपूर्वी कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कांबा, पावशेपाडा, पाचवा मैल, पांजरापोळ व रायते आदी परिसरात तलवार, चाँपर अशा जीवघेण्या शस्त्रांसह ८ ते १० जणांच्या टोळीने दरोडा टाकला होता. त्यावेळी या टोळीने काही जणांना शस्त्र दाखवून मारहाण करीत त्यांच्याकडून किंमती ऐवज हिसकावून घेतला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. कल्याण तालुका पोलिसांनी या घटनांची गंभीरतेने दखल घेत तपास सुरु केला. 

पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मुरबाडचे पोलीस उपअधीक्षक शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू वंजारी यांनी व ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेने विविध पथके तयार करुन मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे गतीने तपास सुरु केला. खात्रीलायक माहितीच्या आधारे त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून किरण जांभळकर, अनिल पवार व अक्षय गायकवाड या तिघांच्या मुसक्या आवळल्या. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३० तारखेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

या प्रकरणातील दरोडेखोर हे चारचाकी गाडीने कल्याण येथे आले होते. त्यांच्या टोळीत सुमारे ८ ते १० जण असून इतरांनाही लवकरच पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे करीत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.