ठाण्यातील हुक्का पार्लर, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

ठाण्यातील हुक्का पार्लर, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सवर धडक कारवाई करून शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत हुक्का पार्लर सुरु असल्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी पत्राद्वारे कळविण्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभागास दिले होते. त्याअनुषंगाने शुक्रवारी मौजे नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील पिंक बाबा या हॉटेलचे शेडचे बांधकाम, पाच लाकड़ी मचान व बांबू ताडपत्री शेडच बांधकाम निष्कासित करण्यात आले. ओवळा ब्लुरुफ येथील वेलवेट गार्डन या हॉटेलच्या शेडचे बांधकाम तसेच नाका हॉटेलच्या शेडचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रणव व निष्कासन विभागाचे उप आयुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच महापालिकच्या अधिकृत ठेकेदाराचे २० मजुर, १ जेसीबी मशीन, २ डंपर इत्यादीच्या साहाय्याने करण्यात आली.