ठाण्यातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज, अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

ठाण्यातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज, अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) : 
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्सवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर प्रभाग समिती स्तरावर मंगळवारी शहरातील पदपथावरील अतिक्रमणे, अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज व पोस्टर्स निष्काषित करण्यात आले. यामध्ये ८३  हातगाड्या, ८२ बॅनर्स, पानटपऱ्या, चायनीज गाड्या  यांच्यासह अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

फुटपाथवरील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व सहाय्यक आयुक्त यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातील सर्व प्रभाग समितीमध्ये धडक कारवाई करण्यात आली. पुढील तीन दिवस ही विशेष मोहिम राबविण्यात येणार असून शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणमुक्त, अनधिकृत बॅनर्समुक्त करण्यात येणार आहेत.

या कारवाई अंतर्गत वागळे प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रातील ५२ हातगाड्या, २० बॅनर्स आणि ३ अनधिकृत बांधकामे, दिवा प्रभाग समितीमध्ये ७ हातगाड्या, २० बॅनर्स, माजिवडा प्रभाग समितीमध्ये ४ प्लास्टिक शेड, २१ फेरीवाले, ११ हातगाड्या, १ ज्यूस मशीन, २ लोखंडी टपऱ्या, २ बॅनर्स, ४ पोस्टर्स  तर वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये  ३५ फेरीवाल्यांची अतिक्रमणे, ५ हातगाड्या  निष्कासित करण्यात आल्या.

मुंब्रा प्रभाग समितीमधील स्टेशन रोड, मुंब्रा मार्केट, आनंद कोळीवाडा मार्केट, तसेच बाबाजी पाटील वाडी ते किस्मत कॉलनीपर्यत कारवाई करण्यात आली. यामध्ये ४० बॅनर, ८ हातगाड्या, ८६ लाकडी बाकडी, २७ लोखंडी स्टॅन्ड, ८ ऊस रस गाड्या, २३ पानटपरी, ६ चायनीज गाड्या व १७९ वेदर शेड तोडण्यात आले. तसेच मुंब्रा शादी महल गल्लीतील फुटपाथवरील ५ पक्के गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आले. पुढील तीन दिवस देखील शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवर  महापलिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.