ठामपाने दिली १०२ रूग्णालयांना लसीकरण केंद्रांची परवानगी

ठामपाने दिली १०२ रूग्णालयांना लसीकरण केंद्रांची परवानगी

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेच्या वतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृहसंकुलांसाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत ठाणे शहरातील जवळपास १०२ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेच्यावतीने सर्व खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृह संकुले यांच्यासाठी लसीकरण धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत महापालिकेने आतापर्यंत १०२ खासगी रूग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी दिली आहे.

केंद्र-राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून ठाण्यात आतापर्यंत १०२ नवीन खासगी हॉस्पिटलना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून यामध्ये १८ क्लिनिक आणि ८४ रुग्णालयांचा समावेश आहे. महापालिकेच्या टीमच्या माध्यमातून सर्व क्लीनिक तसेच रुग्णालयांची कायदेशीर तपासणी करून लसीकरणासाठी सक्षम असल्याची पडताळणी करूनच रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना येथे यापूर्वीच लसीकरण सुरू करण्यात आले असून खासगी गृहसंकुलांमध्ये ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे पहिले खासगी लसीकरण करण्यात आले आहे.