कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कोळी बांधवाचे समुद्राला साकडे

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कोळी बांधवाचे समुद्राला साकडे

कल्याण (प्रतिनिधी) : कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कल्याणमध्ये  कोळी बांधवानी नारळी पौर्णिमे निमित्त समुद्राला साकडे घातले.

पावसाळ्यात उधाणलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने कोळी समाजात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला विशेष महत्व असते. दरवर्षी कल्याणच्या शिवाजी चौकातून कोळी बांधव-भगिनी ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढत दुर्गाडी खाडीत समुद्राला नारळ अपर्ण करतात. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे मिरवणूक बंद असल्याने यंदा देखील  कोळी महासंघाचे उपाध्यक्ष देवानंद भोईर यांच्याहस्ते  अतिशय सध्या पद्धतीने उत्सव साजरा करत कल्याण खाडीत नारळ अपर्ण करण्यात आला.

यावेळी जगावर घोंघावणारे करोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालण्यात आले. देवानंद भोईर यांनी नागरिकांसाठी कोरोना लसीचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, मागील काही दिवसात आलेल्या चक्रीवादळ आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोळी बांधवाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या कोळी बांधवांना नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी केली.