जिप शाळांच्या खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत प्रस्ताव सादर करणार - ग्रामविकासमंत्री

जिप शाळांच्या खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत प्रस्ताव सादर करणार - ग्रामविकासमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषदेच्या शाळा, खोल्या दुरुस्तीबाबत असलेल्या वेगवेगळ्या निधींना एकत्र करुन त्याद्वारे दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याची, माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पन्हाळा, जि. कोल्हापूर तालुक्यातील शाळा, खोल्यांच्या दुरुस्तीबाबत आ. सत्यजीत पाटील-सरुडकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या.

ज्या शाळांच्या इमारती धोकादायक व वापरण्यास अयोग्य आहेत, अशा इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी न बसवता सार्वजनिक इमारतीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, असेही श्रीमती मुंडे म्हणाल्या. राज्यातील जि.प.च्या शाळा दुरुस्तीबाबत असलेला सादील, जिल्हा नियोजन व राज्य निधी एकत्र करुन त्याद्वारे टप्प्या-टप्प्याने दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला.