केडीएमसी’तील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक

केडीएमसी’तील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील खड्डयांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी उशिराने का होईना महानगरपालिका प्रशासनाने टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी महानगरपालिकेने खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्याकरिता टोल फ्री क्रमांक जाहीर केला. आता जबाबदार नागरिकांनी रस्त्यावरील खड्डयांच्या तक्रारी करून ते त्वरेने भरले जातील यावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

गेले तीन महिने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे, तसेच रस्ते दुरुस्ती करण्याच्या कामास प्रारंभ केला आहे. आता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी, महानगरपालिकेने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात,  असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांनी केले आहे.