वडवली फाटक येथे बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी

वडवली फाटक येथे बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण जवळील वडवली रेल्वे फाटक येथे नियम मोडून ‘वन वे’मध्ये वाहने हाकणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ‘वन वे’मध्ये घुसणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

शहाड – कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या ४७ गेट (फाटक) येथे रेल्वे मार्गावर रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे दहा वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या कल्याणच्या दिशेने वडवली गावाच्या बाजूने  या उड्डाणपुलाला उतार देण्याचे काम सुरु आहे. परिणामी येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी फाटकासमोर वळण मार्ग तयार करण्यात आला आहे. फाटकाकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ‘वन वे’ देण्यात आला आहे. मात्र कल्याणकडून येणारी दुचाकी-रिक्षांसह इतर वाहने वळण मार्गाचा वापर न करता ‘वन वे’ तोडून फाटकाकडे जात असल्याने रेल्वे फाटकात वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या कोंडीमुळे फाटकात वाहने अडकून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता येथून प्रवास करणारे प्रवासी व्यक्त करीत आहेत.   

येथील ‘वन वे’मध्ये घुसणाऱ्या वाहनचालकांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडत असल्याचा आरोप सुजाण नागरिक व वाहन चालकांकडून केला जात आहे. ही समस्या टाळण्यासाठी ‘वन वे’ तोडणाऱ्या मुजोर वाहनचालकांवर वाहतूक शाखा आणि आरटीओने मोठी दंडात्मक कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर यांनी ‘कोंकण वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली आहे.