आदिवासींनी जल्लोषात साजरा केला दिवाळीचा पहिला दिवस

आदिवासींनी जल्लोषात साजरा केला दिवाळीचा पहिला दिवस

ठाणे (प्रतिनिधी) : 
ठाणे, पालघर जिल्हातील आदिवासी वारली, कोकणा महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी, क-ठाकर व म-ठाकर इत्यादी जमातीच्या संस्कृतीला महत्त्व असून एक वेगळी संस्कुती आहे. त्याची ओळख आदिवासी समाजाला व येणाऱ्या पुढील पिढीला व्हावी म्हणून सालाबाद प्रमाणे २५ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील आदिवासी संस्कुतीचे प्रतिक तारपाधारी अर्धपुतळ्या जवळ दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आदिवासीं संस्कृतीचे दर्शन दाखवत जल्लोषात साजरा केला.

यावेळी आदिवासी  वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ यांच्या नेतृत्वाखाली तारपाधारी पुतळ्यास अभिवादन, पुष्पहार अर्पण करून आपल्या कुलदैवतांची पूजा करून, आदिवासी बांधवानी पारंपरिक तारपाधारी नृत्य सादर केले. पूर्वजांनी जपून ठेवलेली संस्कृती आधुनिक काळातदेखील तितक्यात ताकदीने जतन करण्याचा प्रयत्न आम्ही आदिवासी बांधव करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हा सण येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा करतो. याप्रमाणे आजही आदिवासी पुरुष व महिलांनी एकत्र येऊन वसुबारस पारंपरिक पद्धतीने साजरी केल्याचे आदिवासी  वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ यांनी आपल्या भाषणात म्हटले. तसेच यावेळी आदिवासी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरा (भांगरे) यांच्या जयंती निमित्ताने कोर्ट नाका येथील राघोजी भांगरा चौकात अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी पाडुरंग कांबडी, नरेश रोज, जयराम वझरे, लक्ष्मण गरेल, किसन तुंबडे, कमलाकर सायरे, शांताराम रिंजड, हंसराज खेवरा, बबन हाल्या बरफ, किसन पागी, हरिश्चंद्र खुलात, बारकू देऊ रिंजड, गंगाराम कोम, डॉ. निलेश परचाके, डॉ. श्रीनिवास सुरपम, डॉ. सुनील प-हाड, डॉ. चेतन गुराडा, शांताराम भूयाळ, सुनील तुकाराम भांगरे, चंद्रकांत गणू वायडे, जनार्दन राऊत, गोविंदा बोटे, प्रकाश फरले, नरेंद्र खुलात, विनायक चंद्रकांत वायडे, शांताराम म. कुऱ्हाडा, प्रकाश मोहनकर, चंद्रशेखर कान्हा लाबडे आदी पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.