ठाण्यातील आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास मिळणार नवी झळाळी 

ठाण्यातील आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास मिळणार नवी झळाळी 

ठाणे  (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्यास रंगरंगोटी करण्यास प्रशासनाने आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेला परवानगी दिली आहे. त्यामुळे या पुतळ्याला नवी झळाळी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या आदिवासी तारपाधारी अर्धपुतळ्याची रंगरंगोटी करण्यासाठी आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेने जिल्हा प्रशासानांकडे पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने त्याकरिता त्यांना परवानगी दिली आहे. संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा, तुकाराम वरठा, सामाजिक कार्यकर्ते सुनील तु. भांगरे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत होते. या ठिकाणी दसरा, जागतिक आदिवासी दिन, वसुबारस (वाघ बारस) अशा सणांच्या दिवशी आदिवासी बांधवांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या तारपाधारी अर्धपुतळ्यास दैवत समजून पूजन केले जात आहे.