साग लाकडाची चोरटी वाहतूक करताना दोघांना अटक

वासिंद (पंडीत मसणे) :
सागाच्या नगांची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याजवळील मुद्देमाल व वाहतूकीसाठी वापरण्यात आलेली वाहने वन विभागाच्या पथकाने नुकत्याच केलेल्या कारवाईत जप्त केली आहेत.
वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शहापुर तालुक्यातील वन परिमंडळ दहागाव- नेवाडा हद्दीतील बरफपाडा गावाजवळ रात्रीच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी दोघांना चोरट्या तोडीचे साग चौपट नगांची वाहतूक करतांना वन अधिकाऱ्यांनी पकडले. या कारवाईत अंदाजे एक लाख दहा हजार किंमतीचे ४० साग चौपट नगासह पाच लाख चाळीस हजार वाहतूक करणारी एक पिकअप टेम्पो आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. संतोष पादीर, रविंद्र वाघे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपीची नावे असल्याचे वनक्षेत्रपाल प्रकाश निकम यांनी सांगितले.
सदर कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी शहापूर प्रकाश चौधरी, खर्डी प्रशांत देशमुख, तानसा विभागाचे संजय चन्ने, तसेच वनपाल के. सी. मोहरघे, डी. व्ही. शेलार, सुनील भोंडीवले, वनरक्षक एस. एच. निकम , सचिन तळपाडे, आर. व्ही. झोले, व्ही. डी. फळे, आर. बी. वाघमारे, प्रवीण विशे, नामदेव बांगर, आर. व्ही. चौधरी, जे. एन. गावंडे, जे. पी. अहिरे यांच्या सह संयुक्त वन व्यवस्थापन, दहागांव समिती पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी सहभाग घेत मदत केली.