भरधाव घोड्यांची दुचाकीस्वार पोलिसाला जोरदार धडक

भरधाव घोड्यांची दुचाकीस्वार पोलिसाला जोरदार धडक

टिटवाळा (प्रतिनिधी) : गणपती मंदिर रस्त्यावर घरआंगण सोसायटी जवळ दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या दोन घोड्यांनी जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीस्वार पोलीस दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडला व जखमी झाला तर एक घोडाही जागीच ठार झाला.

सदरील अपघात सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडला. पोलीस हवालदार विजय नाईक हे आपल्या बाईकवरून (एमएच ०५ बीएल ८५१५) टिटवाळा स्टेशनकडे चाललेले होते. त्यावेळी समोरून वेगात धावत आलेल्या दोन घोड्यांनी त्यांना जोरदार धडक दिली. त्यात नाईक हे गाडीवरून उडून बाजूला पडले. त्यांच्या छातीला मुका मार लागला तर पायाच्या गुडघ्या खालून रक्तस्राव सुरू झाला. या अपघातात दोनपैकी एक घोडा जागीच ठार झाला. यावेळी तेथून जाणारे पत्रकार राजू टपाल यांनी त्वरेने दोन पादचाऱ्यांच्या मदतीने नाईक यांना रस्त्याच्या कडेला आणून बसवले. तसेच या अपघाताची खबर गणपती मंदिरजवळ कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक कमलाकर मुंडे यांना दिली. मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या नाईक यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

पोलीस हवालदार विजय नाईक यांनी बाईक चालवताना हेल्मेट घातले होते. तसेच जिथे अपघात झाला तिथे स्पीडब्रेकर असल्याने त्यांचा गाडीचा स्पीड कमी होता. मात्र उजव्या बाजूने रस्त्यावरून ते दोन्ही घोडे खूपच जोरात धावत आल्याने हा अपघात भयंकर घडला. 

मोकाट घोड्यांच्या मालकांवर कारवाई व्हावी

टिटवाळा येथील अनेक टांगा चालकांनी घोडे मोकाट सोडून दिलेले अनेकदा पहावयास मिळते. अशा मोकाट सोडून दिलेल्या घोड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असून यापूर्वी देखील असे अपघात घडल्याचे बोलले जाते. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या या घोड्यांच्या मालकांवर कारवाई करण्याची  मागणी पुढे येऊ लागली आहे.