उद्धव ठाकरे यांनी दारूबंदी करून महाराष्ट्रात शिवराज्य आणावे!

उद्धव ठाकरे यांनी  दारूबंदी करून महाराष्ट्रात शिवराज्य आणावे!

कल्याण (प्रतिनिधी) : संसार उध्वस्त करणाऱ्या दारूची दुकाने (मद्य), बिअर बार-शॉप व ताडी-माडी केंद्रे लॉकडाऊनच्या काळात पूर्णत: बंद ठेवण्यात यावीत, तसेच शक्यतो गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात कायमस्वरूपी ‘दारूबंदी’ करण्याचा निर्णय घ्यावा, अशीही मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी सर्व उद्योग व्यवसाय, आस्थापना दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यात गावठी दारूपासून विदेशी मद्याच्या दारूच्या दुकानांचा समावेश आहेच. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने, बिअर बार-शॉप व ताडी-माडी केंद्रे देखील बंद असल्याने अट्टल मद्यपींची फारच अडचण होत असल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या सरकार लॉकडाऊन शिथिल करीत काही व्यवसाय-उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत विचार करीत असल्याचे समजते. त्यात दारू विक्री, बिअर बार-शॉपच्या दुकानांना परवानगी देण्याचेही विचाराधीन असल्याचे समजते, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दारू विक्री बंद असल्याने शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. असे असले तरी या दारू बंदीमुळे अनेक फायदे झाल्याचे समोर येत आहे. घरोघरी होणारी भांडणे कमी झाली, रस्त्यावरचे राडे कमी झाले, दारूमुळे ज्या घरात पैसा ठरत नव्हता त्या घरातील बायकापोरांना दोन घास खायला मिळू लागले, गुन्हेगारी घटना कमी झाल्या, परिणामी पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला. या पार्श्वभूमीवर दारू विक्रीला परवानगी दिली गेली तर अशा गैरप्रकारांना पुन्हा सुरुवात होईल, तर काही कुटुंबांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ ओढवेल. महत्वाचे म्हणजे सोशल डीस्टन्सिंग पाळले जाणार नाही. लोकांच्या कमी वर्दळीमुळे रस्त्यावर नागरिकांची, महिलांच्या दागिन्यांची लुटालुट करण्याचे प्रकार घडतील याची जबाबदारी कोणावर राहील? सरकार ही जबाबदारी स्वीकारणार आहे का, हा आमचा सवाल असल्याचे जोगदंड यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळातही लपूनछपून विदेशी मद्याची गैरमार्गाने, चढ्या भावाने विकले जाते आहे. तसेच गावठी दारू, मोहाची दारू, जांभळाची दारू देखील सर्रास विकली जात आहे याकडेही या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

अन्नधान्य हे जीवनावश्यक आहे दारू नव्हे! 

गोरगरीब बायकापोरांचे शिव्याशाप घेण्याऐवजी किमान लॉकडाऊन संपेपर्यंत तरी कोणत्याही स्वरुपात दारू विक्री, बिअर बार-शॉप, ताडी-माडी विक्री सुरु करण्याला परवानगी देऊ नये, आणि शक्य झाल्यास गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात यावा. गुजरातमध्ये दारू बंदी असूनही तेथे सर्व काही सुजलाम सुफलाम आहे, भरभराट होत आहे. अन्य राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. अशाच प्रकारे महाराष्ट्राला देखील संपन्न करता येऊ शकते. तरी यासाठी महाराष्ट्र शासनाने देखील महाराष्ट्रात कायमस्वरूपी दारूबंदी करण्याचा निर्णय घेऊन शिवराज्य आणावे, अशी विनंती अॅड. धनंजय जोगदंड यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. सदर निवेदन राज्याचे राज्यपाल, राज्य उत्पादन शुल्कमंत्री, महसूलमंत्री यांनाही इमेल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.