कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु 

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांच्या गर्दीने वाहतूक कोंडीची समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रिक्षावाल्यांसह अन्य बेशिस्त वाहन चालकांमुळे या कोंडीत अधिक भर पडत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आ. नरेंद्र पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर आजपासून  (मंगळवार) कठोर कारवाईला सुरुवात झाल्याचे दिसून आले.

महापालिका प्रशासनाच्या कारवाईचे फेरीवाल्यांना भय नसल्याचे चित्र पाहून आ. नरेंद्र पवार यांनी सोमवारी संबंधित अधिकार्‍यांसोबत बैठक घेत अनधिकृत फेरीवाले व  वाहतूकीला अडथळा आणणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. रेल्वे स्थानकात अधिकृत फेरीवाल्यांसोबतच मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांची गर्दी असते. स्कायवॉकवरही मोठ्या प्रमाणात फेरीवाले उभे असतात याचा प्रचंड त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने आखून दिलेल्या रेषेच्या आतमध्ये फेरीवाले बसत नाहीत. काही नागरिक नो पार्किंग झोनमध्ये गाड्या लावतात त्यामुळेही वाहतूक यंत्रणेचा बोजवारा उडत आहे. सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने अनधिकृत फेरीवाले आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी सदर बैठकीत केली.

या बैठकीला परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश लोंढे, वाहतूक पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील, ‘क’ प्रभाग अधिकारी भारत पवार, फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे, संजय जाधव, सदा कोकणे, प्रशांत माळी आदी उपस्थित होते.

सदर बैठकीनंतर आजपासून स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटविण्यास महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. या कारवाईच्या वेळी काही विक्रेत्यांचे लोखंडी स्टँड अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचाऱ्यांनी हातोड्याचे घाव घालून तोडल्याचे चित्र दिसून आले. काहींनी या कारवाईचे मोबाइलमध्ये चित्रण देखील केले. या कठोर कारवाईने अनधिकृत विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई पाहणाऱ्या पादचाऱ्यांनी आता महापालिका प्रशासनाने अशाच प्रकारे पश्चिमेतील स्काय वॉक देखील फेरीवालामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.