कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाखं झाडं

कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाखं झाडं

मुंबई (प्रतिनिधी) : 
शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत घालून दिला आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांच्या काळात ग्रामपंचायत क्षेत्रात साधारणत: ५ लाख ६५ हजार ६७१ मुलींचा जन्म झाला. त्यापैकी योजनेत २ लाख १५ हजार ९५३ इतके ऐच्छिक लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यांना योजनेत नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत ५ सागाची तर ५ फळझाडाची रोपे देण्यात येणार आहेत. ३३ कोटी वृक्षलागवडी पैकी २१ लाख ५९ हजार ५३० झाडं शेतकऱ्यांच्या लेकीच्या नावाने लावली जाणार आहेत.

ज्या शेतकरी दाम्पत्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांना वन विभागाकडून पाच सागाची तर पाच फळझाडाची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात. ५ सागाच्या रोपांशिवाय दिल्या जाणाऱ्या फळझाडांच्या रोपांमध्ये २ रोपे आंब्याची, १ रोपं फणसाचं, १ रोपं जांभळाच तर एक रोपं चिंचेच आहे.  भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन वृक्षांची निवड करण्यात आली आहे. मुलीच्या जन्माबरोबर वृक्ष लावल्यास मुलगी जशी मोठी होईल तसे वृक्ष ही मोठे होत जातील. तिच्या लग्नापर्यंत हे वृक्ष मोठे झालेले असतील. फळांनी लगडलेले असतील. त्यातून पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत देखील विकसित होऊ शकेल. सागाच्या वृक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिच्या विवाहाच्या वेळी आवश्यकता असणारी पैशांची निकड ही भागवता येऊ शकेल.

शेतकरी कुटूंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्राम पंचायतीच्या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद करावयाची आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहीत नमुन्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे. वाढत्या जागतिक तापमानाचे धोके कमी करायचे असतील तर राज्यात वृक्षाच्छादन वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे हरित क्षेत्र राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्क्यांपर्यंत जावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन राज्याची हरित महाराष्ट्राच्या निर्मितीकडे वाटचाल सुरु आहे. कन्या वन समृद्धी योजनेचे बीजही यातूनच रुजले आहे.