कल्याणमध्ये स्वातंत्र्यसैनिक-शहिदांच्या स्मारकांची अक्षम्य हेळसांड!

कल्याणमध्ये स्वातंत्र्यसैनिक-शहिदांच्या स्मारकांची अक्षम्य हेळसांड!

कल्याण (प्रविण आंब्रे) : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७३ वा वर्धापन दिन उद्या शनिवारी साजरा असताना शहरातील शहिदांच्या स्मारकांची होत असलेली हेळसांड पुन्हा एकदा समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाबाहेरील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची झालेली दुरवस्था, सहा महिन्यांपासून दुरुस्तीला नेलेला महात्मा फुले चौकातील शहीद स्मृती स्तंभ व आयुक्त बंगल्यासमोरील सहा वर्षांपासून रखडलेले शहीद निलेश संगपाळ स्मारक ही कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य उदासीनतेची उदाहरणे ठरली आहेत. या प्रकाराबद्दल कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

२६ नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतीनिमित्त कल्याणमधील महात्मा फुले चौकात उभारण्यात आलेला शहीद स्मृती स्तंभाच्या चौथऱ्यावरील स्मारक दुरुस्तीसाठी नेऊन सहा महिने उलटूनही ते पूर्ववत बसविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचे समोर आल्याने कल्याणकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहिदांची स्मारके ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली पाहीजेत. त्यासाठीच ती उभारली जातात. याकरिता त्यांची उत्तम निगा राखणे-देखभाल करण्याची आवश्यकता असताना कल्याण डोंबिवलीमधील काही स्मारके पार दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. अधिक माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस-नागरिक यांच्या स्मृती जपण्यासाठी महापालिकेच्या ‘क’ प्रभागाच्या तत्कालीन सभापती तथा स्थानिक नगरसेविका अस्मिता अरविंद मोरे यांच्या प्रयत्नाने शिवसेनेचे तत्कालीन महापौर रमेश जाधव यांच्या कार्यकाळात कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौकात छोटेखानी शहीद स्मृती स्तंभ उभारण्यात आला होता. या स्तंभाच्या चौथऱ्यावर रोवलेल्या स्थितीतील रायफल आणि त्यावर जवानाची कॅप होती. स्तंभावर हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबले, संदीप उन्नीकृष्णन या शहीद पोलीस अधिकारी-जवानांची नावे कोरली आहेत. या स्मारकावर उद्घाटक म्हणून उपस्थित कल्याण डोंबिवलीच्या तत्कालीन महापौरांसह आयुक्त रामनाथ सोनावणे, पोलीस आयुक्त भुजंगराव शिंदे आदींची नावे आहेत.

सदर स्मृती स्तंभाबाबत माहिती घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने याप्रकरणी महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी (देवनपल्ली) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत माझ्याकडे सध्या काही माहिती उपलब्ध नाही. या विषयी सबंधित कार्यकारी अभियंता अथवा उपअभियंत्यांकडून माहिती घ्यावी लागेल. त्यांचा नंबर देते असे सांगत कोळी यांनी भ्रमणध्वनी ठेवून दिला. 

महापालिकेचे सचिव तथा उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून याबाबत संपर्क साधला असता, हा स्तंभ पोलिसांनी उभारल्याचे सांगत स्मारकांची देखभाल ही प्रभाग क्षेत्र कार्यालयांकडून केली जात असल्याचे ते म्हणाले.

याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक अरविंद मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा स्तंभ सहा महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडून नेण्यात आल्याचे सांगितले. सहा महिने उलटूनही या स्तंभाच्या दुरुस्तीचे काम करण्यात महापालिका प्रशासन करू शकले नाही याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था

कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानकाबाहेर लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर नेहरू चौकात कल्याण डोंबिवली शहरातील स्वातंत्र्यसैनिकांची नामावली असलेले स्मारक उभारण्यात आलेले आहे. तेही पूर्णत: दुर्लक्षित झाले आहे. या स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. तेथे अनेकदा गर्दुल्ल्यांचा राबता असल्याचे दिसून येते. मद्याच्या बाटल्याही त्याभोवती अनेकदा आढळून आलेल्या आहेत. सध्या या स्मारका भोवती दुचाकींचा वेढा पडलेला दिसतो. 

सव्वाचार लाखांची फाईल ५ वर्षांपासून रखडली

काही वर्षांपूर्वी संतोषीमाता मंदिर रस्त्यावर महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोरील चौकात दुभाजकाच्या ठिकाणी शहीद जवान निलेश मधुकर संगपाळ यांचे स्मारक उभारण्यात आले होते. मात्र हे स्मारक दुभाजकामध्ये असल्याने त्याला वाहनांची धडक लागून वारंवार अपघात होत असे. त्यामुळे हे स्मारक तेथून हटवून ‘ब’ प्रभागात अडगळीत नेऊन ठेवण्यात आले. त्याबाबत गाजावाजा झाल्यानंतर हे स्मारक पूर्वीच्या ठिकाणीच असलेल्या राणी लक्ष्मीबाई उद्यानात ठेवण्यात आले. महापालिका स्तरावर शहीद निलेश संगपाळ यांचे स्मारक सन्मानपूर्वक स्थापित करण्याचा निर्णय घेण्यातही आला. त्यासाठी सव्वाचार लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र विविध मंजुऱ्यांच्या नावाने गेल्या सहा वर्षांपासून फाईल महापालिकेच्या इमारतीतच येरझाऱ्या घालत आहे. 

याप्रकरणी शहीद निलेश संगपाळ यांचे वडील मधुकर महादेव संगपाळ, माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश दळवी यांनी महापालिका आयुक्तांना अनेकदा पत्रे लिहून स्मारकाच्या कामासाठी पाठपुरावा केला. मधुकर संगपाळ यांनी तर या स्मारकाची दुरुस्ती करायला वेळ नसल्याच्या दुदैवी प्रकाराबद्दल सहा वर्षांपूर्वीच संतापही व्यक्त केला होता, तरी महापालिका प्रशासन या स्मारकाबाबत आजतागायत उदासीन असल्याचे चित्र आहे.  

शहरातील स्मारकांबाबत नियमित आवाज उठविणारे योगेश दळवी हे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, महापालिकेचे प्रशासन स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनापुरती या स्मारकांची स्वच्छता करते. इतर वेळी रेल्वे स्थानका समोरील स्वातंत्र्यसैनिक स्मारकाचा वापर तेथील भाजीविक्रेते भाजीच्या गोण्या वगैरेसाठी करतात. गर्दुल्ले नशापाणी करण्यासाठी-झोपण्यासाठी स्मारकाचा वापर करतात. शहरातील स्मारकांची नियमित देखभाल राखली जाणे आवश्यक आहे.

देखभाल जमत नाही तर शहिदांची स्मारके उभारताच कशाला?

स्मारके कशी जतन करायची याचे सुतराम भान ही स्मारके उभारणाऱ्याना नाही. जर देखभाल करता येत नसेल तर स्मारके उभारताच कशाला, असा धारदार सवाल आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी केला आहे. किमान स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन साजरे होत असताना प्रेरणादायी स्मारके सुस्थितीत राखणे महापालिका प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी प्रशासनाने दैनंदिन जबाबदारी निश्चित करणे व चेकलिस्ट ठरवणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.