पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू 

पाण्याने भरलेल्या मोठ्या  खड्ड्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू 

टिटवाळा (प्रतिनिधी) : 
टिटवाळा नजीक असलेल्या बल्याणी परिसरात एका ठिकाणी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून दोघा अकरावर्षीय मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे याच भागात यापूर्वी देखील विविध कारणामुळे अशाच काही घटना घडल्या आहेत.

टिटवाळा नजीकच्या बल्याणी येथील नांदप रस्त्यावर एका ठिकाणी चाळींच्या ठिकाणी काही मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले होते. सतत पडत असलेल्या पावसाने हे खड्डे भरले होते. याच भागातील गुप्ता चाळीत राहणारे मयांक सुनील शर्मा, पियुष पवन ओझा ही दोन ११ वर्षीय मुले सोमवारी शाळा लवकर सुटल्याने सदरहू ठिकाणी फिरत फिरत गेले. तेथे ते दोघेही पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कळताच परिसरावर शोककळा पसरली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण येथील रूक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.

बांधकाम व्यावसायिक वा तत्सम व्यक्तींनी विविध कारणासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे महापालिका हद्दीत यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. मोहोने, अटाळी, कल्याण भागात यापूर्वी काही बांधकामाच्या ठिकाणी विविध कारणासाठी खोदलेल्या खड्डयांमध्ये पडून अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडूनही बांधकाम व्यावसायिक वा तत्सम व्यक्ती कोणतीही काळजी घेत नसल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.