कामगार नेते कोणार्क देसाई यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

कामगार नेते कोणार्क देसाई यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण येथील कामगार नेते कोणार्क देसाई यांनी नुकताच आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्यावर कल्याण शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपने देसाई यांना पक्षात घेऊन या निवडणुकीसाठी पक्ष जोरदार तयारी करीत असल्याचे संकेत दिले आहे.

कल्याण पूर्व येथील आपच्या कार्यालयात आयोजित बैठकीत व पक्षाचे कल्याण डोंबिवलीचे निरीक्षक रुबेन मस्करेहंस, कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या हस्ते कोणार्क देसाई यांना पक्षाची टोपी व स्कार्फ देऊन त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. यावेळी रविंद्र केदारे, रुपेश पाटील, आमीर बेग, राजेश शेलार, फैयाज मुल्ला, रवी जाधव, किरण इंगळे आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी देसाई यांची कल्याण पश्चिम शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे मस्करेहंस यांनी घोषित केले. यंदाची कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक पक्ष गंभीरतेने लढविणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिल्लीमध्ये आपने दिलेल्या सुविधा येथील नागरिकांना पुरविण्यासाठी आम आदमी पक्ष कटिबद्ध असून आप यंदाच्या महापालिका निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करीत महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणील, असा विश्वास व्यक्त केला. 

याप्रसंगी धनंजय जोगदंड यांनी कल्याण, डोंबिवली, आंबिवली व टिटवाळा या भागातून मोठ्या संख्येने पक्षात लोक येत असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. देसाई यांनी महापालिकेत आम आदमी पक्षाचे नगरसेवक निवडून आणू असा उपस्थित कार्यकर्त्यांना विश्वास दिला. बैठकीला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.