कल्याणमधील राजमाता जिजामाता भोसले मार्गाच्या नामफलकाचे अनावरण 

कल्याणमधील राजमाता जिजामाता भोसले मार्गाच्या नामफलकाचे अनावरण 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिमेतील अनंत रिजेन्सी ते ठाणगेवाडी रस्त्याचे राजमाता जिजामाता यांच्या जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी राजमाता जिजामाता भोसले मार्ग असे नामकरण करण्यात आले. सदर नामफलकाचे अनावरण साहित्यिक भिकू बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठा सेनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद मोरे, प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अनंत रिजेन्सी ते ठाणगेवाडी या रस्त्याला राजमाता जिजामाता भोसले मार्ग असे नाव देण्याची मागणी येथील मराठा प्रतिष्ठान संस्थेकडून करण्यात आली होती. स्थानिक रहिवाशांच्या मागणीचा सन्मान करीत स्थानिक नगरसेवक सचिन बासरे यांनी महासभेत प्रस्ताव आणून अनंत रिजेन्सी ते ठाणगेवाडी रस्त्याला नाव राजमाता जिजामाता भोसले मार्ग हे नाव देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. मराठा प्रतिष्ठान व स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने सदर रस्त्याच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. राजमाता जिजामाता भोसले मार्ग हे नाव देण्याची मागणी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष सुरेश फंड व रवींद्र कदम यांनी केली होती. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमलता पवार यांनी या कार्यक्रमाला खास उपस्थित दर्शविली. या कार्यक्रमाला हेमलता कदम, विजया शिंदे, प्रल्हाद भिलारे, हेमंत यादगिरे, दर्शन देशमुख, विजय शिर्के, राकेश देशमुख, नितीन सकपाळ, प्रकाश जाधव, चेतन महामुणकर, प्रसाद दळवी, हर्षद सुर्वे, राजू बिरमाणे, गौरव गुजर, सुभाष गायकवाड, सचिन कदम, सतीश फंड, राजेंद्र चव्हाण, श्याम आवारे, अजया आवारे आदींसह स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.