महावितरणच्या अद्यावत सिटीझन चार्टरमुळे ग्राहक सेवेला बळकटी

महावितरणच्या अद्यावत सिटीझन चार्टरमुळे ग्राहक सेवेला बळकटी

मुंबई (प्रतिनिधी) :
महावितरणच्या अद्यावत सिटीझन चार्टरचे (नागरिकांची सनद) प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे.  ग्राहकांना दैनंदिन जीवनात कंपनीशी संबंधित विविध सेवा मिळवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींची माहिती या सिटीझन चार्टरमध्ये देण्यात आली आहे. ग्राहक सेवेच्या बांधिलकीतून कंपनीने उचललेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. 'सिटीझन चार्टर'मध्ये ग्राहकांना आवश्यक सर्व सेवा-सुविधांच्या माहितीचा समवेश करण्यात आला असून या सर्व माहितीची मांडणी सोप्या व सुटसुटीत पद्धतीने करण्यात आली आहे. या नवीन अद्यावत सिटीझन चार्टरमुळे महावितरणच्या ग्राहक सेवेत संख्यात्मक व गुणात्मक बदल होतील, असा विश्वास महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.

महावितरणच्या सिटीझन चार्टरचे प्रकाशन शुक्रवारी केंद्रीय वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष पी.के. पुजारी व  राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते व  केंद्रीय  वीज नियामक आयोगाचे मुख्य नियामक सुशांत चॅटर्जी, राज्य वीज नियामक आयोगाचे सदस्य मुकेश खुल्लर व आय.एम. बोहरी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार,  महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया, पॉवर सिस्टीम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक केव्हीएस. बाबा यांच्या उपस्थितीत झाले. 

अद्ययावत सिटीझन चार्टर महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवेची गुणवत्ता, सेवेची निवड, सेवा मिळण्याचे  ठिकाण, विहित पद्धत, पारदर्शकता, विश्वासार्हता याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. या सिटीझन चार्टरमध्ये  ग्राहक सेवेप्रती महावितरणचे ध्येय, उद्दिष्ट, प्रशासकीय संरचना, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती तपशीलासह व आवश्यक त्या संदर्भासह देण्यात आली आहे. त्याचबरोबर या सेवांकरता आवश्यक वेळ, त्याची पद्धत, तक्रार निवारण पद्धत या सर्वांचा समावेश या सिटीझन चार्टरमध्ये करण्यात आला आहे. 

या सिटीझन चार्टरमध्ये महावितरणचे संकेतस्थळ, पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा, नवीन जोडणी, बिल दुरुस्ती, नावात बदल, पत्ता बदल, चेंज ऑफ टेरिफ, मिटर  टेस्टिंग, बिल विषयक सेवा, वीज पुरवठा विषयक सेवा, नवीन जोडणी, नावात बदल, लोड मध्ये बदल, गो -ग्रीन सुविधा, ग्राहकाने मीटर रिडींग जमा करणे, नवीन वीज जोडणी, तात्पुरती जोडणी, पुर्नर जोडणी, बिल भरणा, बिलिंग तक्रारी, सुरक्षा ठेव परतावा, मीटर टेस्टिंग, मीटर बदली करणे, लाईन शिफ्ट करणे, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑफ लाईन सुविधा, विविध सेवा पुरवण्यासाठी येणार खर्च, विविध सेवांकरता असलेले 'स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर',  विविध सेवा करता आवश्यक कालावधी, तक्रार निवारण यंत्रणा, तक्रार निवारण्याचा विविध पातळ्या, माहितीचा अधिकार, आवश्यक फोन नंबर, ग्राहक सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व सर्व सेवांच्या करता आवश्यक अर्ज आदी माहिती या सिटीझन चार्टरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.