अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी-सुविधा लवकरच

अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी-सुविधा लवकरच

मुंबई (प्रतिनिधी) :
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या अपुऱ्या व प्रलंबित नागरी सोयी-सुविधा लवकरच देऊ व त्या भागाला प्रत्यक्ष भेट देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.

अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या अपुऱ्या व प्रलंबित नागरी सोयी-सुविधा याबाबतची लक्षवेधी सूचना ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना भेगडे बोलत होते. ते म्हणाले की, अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार नादुरुस्त नागरी सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना निविदा प्रक्रिया पूर्ण करुन दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ८० टक्के दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. संपूर्ण दुरुस्ती झाल्यावर विहित नागरी सुविधांसह पुनर्वसित गावठाणाचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांनाच जर जागा दिली नसेल तर याबाबत चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करु. यावेळी आ. हेमंत टकले, आ. अनिल परब, आ. जयंत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.