‘सोशल रीडिंग: रेस्ट्रोस्पेक्टीव्ह अँड रिव्ह्यूज’मध्ये सामाजिक घटना-घडामोडींचे उपयुक्त विश्लेषण- प्रा. ई. वायुनंदन

‘सोशल रीडिंग: रेस्ट्रोस्पेक्टीव्ह अँड रिव्ह्यूज’मध्ये सामाजिक घटना-घडामोडींचे उपयुक्त विश्लेषण- प्रा. ई. वायुनंदन

नाशिक (प्रतिनिधी) : देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडलेल्या विविध सामाजिक घटना घडामोडींचा अभ्यासपूर्ण परामर्श डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी आपल्या सोशल रीडिंग: रेस्ट्रोस्पेक्टीव्ह अँड रिव्ह्यूज या इंग्रजी पुस्तकातून घेतला आहे. हे पुस्तक सामाजिकशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक तसेच शिक्षकांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व  सामाजिक शास्त्रे विद्याशाखेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या सोशल रीडिंग: रेस्ट्रोस्पेक्टीव्ह अँड रिव्ह्यूज या पुस्तकाचे प्रकाशन करतांना प्रा. ई. वायुनंदन बोलत होते. या पुस्तकात डॉ. घोडेस्वार यांच्या पूर्व प्रकाशित ३२ लेखांचा समावेश असून त्यांनी यातून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबुराव बागुल, शाहीर अमर शेख, विदया बाळ, राहीबाई पोपरे यांच्या जीवन कार्याचा वेध घेतला आहे. त्याच प्रमाणे आदिवासी समुदायावर परिणाम करणारा कायदा, कुपोषण, भारतीय राज्यघटना, झुंडीने केलेल्या हत्या, उदयोजकीय सामाजिक जबाबदारी निधी, बाल मनोरंजन धोरणाची गरज, मानवी हक्क, स्त्री सक्षमीकरणासाठी दूरस्थ शिक्षण, युवा लोकसंख्या, भारत बदलणारे पर्यटन, राष्ट्रीय सेवा योजनेची ५० वर्ष, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका प्रचार, एक देश एक निवडणुक, संविधान उददेशिका वाचन यासारख्या ‍विषयांचा थोडक्यात आढावा घेण्यात आलेला आहे. पुण्याच्या आव्हान बुक स्मिथस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशन केलेले आहे. 

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे हे देखील उपस्थित होते. प्रा. वायुनंदन आणि डॉ. भोंडे यांनी या पुस्तकाचे लेखक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचे अभिनंदन करुन पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांच्या हातून आधिकाधिक पुस्तकांचे लेखन व्हावे अशी अपेक्षा  त्यांनी यावेळी व्यक्त केली.कोविड १९ मुळे सदर पुस्तकाचे प्रकाशन सार्वजनिक कार्यक्रमात न करता कुलगुरुंच्या दालनात करण्यात आले.