ठाण्यातील परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

ठाण्यातील परदेशात जाणाऱ्या १९५ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण

ठाणे (प्रतिनिधी) : परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्यावतीने माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 'वॉक इन' पद्धतीने सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेंतर्गत सोमवारी पहिल्याच दिवशी १९५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवारी देखील सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत लसीकरण सुरु राहणार आहे.

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 'वॉक इन' लसीकरण सुविधा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सदरच्या केंद्रात लस देण्यात येत असून परदेश प्रवेशपत्र, व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस देण्यात येत आहे. तरी महापालिका क्षेत्रातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.