आमदार पुत्राच्या लग्नाच्या खर्चातून दोन हजार नागरिकांचे लसीकरण

आमदार पुत्राच्या लग्नाच्या खर्चातून दोन हजार नागरिकांचे लसीकरण

कल्याण (प्रातिनिधी) : देशभर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस भीषण बनत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचं ठरवलं होतं. या लग्नावरील खर्च नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी वापरण्याचा निर्णय गायकवाडांनी घेतला होता.

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यामार्फत मोफत लसीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्याची घोषणा त्यांनी मे महिन्यात केली होती. त्यानुसार आजपासून या लसीकरणाला कल्याणमध्ये सुरूवात झाली आहे. या उपक्रमातून आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना संकटकाळात समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे.

सोमवारपासून सुरू झालेली आ. गायकवाड यांची लसीकरण मोहीम ३ दिवस चालणार आहे. यामध्ये परिसरातल्या २ हजार नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, लॉण्ड्रीचालक यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लसीकरण मोहीमेच्या शुभारंभाला आ. गणपत गायकवाड यांच्यासह भाजप कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक मनोज राय  आदी पदाधिकारी उपस्थित होते.