कोकणातील पर्यटनवाढीसाठी पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा - मुख्यमंत्री 

कोकणातील पर्यटनवाढीसाठी पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा - मुख्यमंत्री 

जळगाव (प्रतिनिधी) : 
कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून गेल्या पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, मत्स्यव्यवसायाच्या वृद्धीसाठी विशेष लक्ष देण्यात आले. रायगड जिल्हा औद्योगिक विकासाच्या अग्रभागी आणण्यात आला. ‘नैना’च्या माध्यमातून तिसरी मुंबई आकारास येत आहे. पालघर व ठाणे जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासीबहुल आहे. या भागात आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे या भागाचा आरोग्य निर्देशांक उंचावला असून कुपोषणमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिली. अनुगामी लोकराज्य महाभियानच्या चौथ्या वार्षिक सोहोळ्यात जनसेवकांनी विचारलेल्या कोकणचा कॅलिफोर्निया केव्हा होणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृद्ध असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

शासनाच्या विविध प्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अनुलोम’ने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद व प्रशंसनीय असल्याचेही मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यावेळी म्हणाले. जैन हिल्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात‘अनुलोम’चा चौथा वार्षिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गिरीष महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक आदी उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे जनसेवक, भाग सेवक, विस्तारक यांचा मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय अधिकारी आणि नागरिकांमध्ये सुसंवाद साधत अनुलोमच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. ही समाधानाची बाब आहे. तसेच गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानात ‘अनुलोम’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेने पुढील वर्षी २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले.

येत्या काळात १०० लाख कोटी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असून २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नियोजन आहे. यामुळे शेती व्यवसाय, सेवा, उद्योग क्षेत्राच्या विस्तारास संधी आहे. त्यातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. देशाची वाटचाल विकसित देशाच्या निर्मितीकडे सुरू आहे. त्यामुळे गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा विकास होईल. त्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची असून त्यासाठी ‘अनुलोम’ला विकासाची संकल्पना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक गतीने काम करावे लागेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.