महावितरणच्या कोकण प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदी विजयकुमार काळम-पाटील 

महावितरणच्या कोकण प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालकपदी विजयकुमार काळम-पाटील 

कल्याण (प्रतिनिधी): 
महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याण येथे सहव्यवस्थापकीय संचालकपदी विजयकुमार काळम पाटील (IAS) नुकतेच रुजू झाले. याप्रसंगी कल्याण परीमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यापूर्वी या पदाचा अतिरिक्त कार्यभार कार्यकारी संचालक अंकुश नाळे यांच्याकडे होता.

विजयकुमार काळम-पाटील यांनी यापूर्वी सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वीरीत्या पदभार सांभाळला आहे. सांगली येथील या कार्याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेत त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरवले आहे. सांगली जिल्हाधिकारी असतांना विजयकुमार काळम-पाटील यांच्या काळात जिल्ह्यातील सर्व मुख्यालये ते गावातील तलाठी कार्यालय यांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासह पाच प्रातांधिकारी  कार्यालये व १० तहसील कार्यालयांना आयएसओ मानांकन त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झाले आहे. तसेच सांगली जिल्ह्यात नागरिकांच्या हृदय विकार शस्त्रक्रियेसाठी त्यांनी 'होप योजना' उत्कृष्टपणे राबवली. याच बरोबर २१ जून २०१८ रोजी एक लाख १० हजार शालेय विद्यार्थी-नागरिक मिळून सूर्यनमस्काराचा उपक्रम राबवला होता. त्याची नोंद लिम्का  बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक रेकॉर्ड, हाय रेज रेकॉर्ड व मार्व्हलस  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे. काळम-पाटील यांनी सोलापूर महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी सोलापूर महापालिकेस स्मार्ट सिटी योजनेत संपूर्ण देशात नवव्या क्रमांकावर प्रथम यादीत स्थान मिळाले व शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे. 

कोकण प्रादेशिक कार्यालया अंतर्गत १२ जिल्ह्याचा  समावेश असून मासिक महसूल सुमारे २५०० कोटी इतका आहे. ‘वीज ही मानवी जीवनाची अविभाज्य घटक बनली असून समाजाची सर्वांगीण प्रगती या ऊर्जेवरच अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहक हिताच्या दृष्टीने महावितरणची अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा आपला प्रयत्न राहील’, असे विजयकुमार काळम-पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.