ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन
 कल्याण (प्रतिनिधी) : 
‘ईव्हीएम हटाओ’, ‘देश बजाओ’ असा नारा देत वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा  आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज कल्याणमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृध्द आहे. जगातील अनेक लोकशाही देशांनी ईव्हीएम मशिन नाकारली आहे. मात्र भारतातील तमाम वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व नाकारणाऱ्या प्रस्थापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्विकार केला आहे. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात म्हणजे खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी मिळेल, अशी आमची मागणी असल्याचे भारिपचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते यांनी यावेळी सांगितले.

कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या आंदोलनाला सुरवात झाली. महात्मा फुले चौक, मोहम्मद आली चौक, बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसीलदार कार्यालयावर या आंदोलकांनी धडक दिली. यावेळी तहसीलदारांकडे आगामी निवडणुकीत ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली.