कल्याणमध्ये मतदानाला दुपारनंतर उत्साह !

कल्याणमध्ये मतदानाला दुपारनंतर उत्साह !

कल्याण (प्रतिनिधी) : 
महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. मात्र यावेळी मतदानाला मतदारांचा काही प्रमाणात कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. लोकसभेला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा यावेळी मतदारांनी तुलनेने कमी प्रतिसाद दिल्याचे एकंदरीत चित्र होते. सकाळपासून मतदारांमध्ये निरुत्साह होता. मात्र दुपारनंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुंब्रा कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने मतदानाच्या दिवशी पाऊस पडण्याचे भाकीत हवामान खात्याकडून वर्तविले गेले होते. त्यामुळे पाऊस पडल्यास मतदार घराबाहेर पडतील अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र आज पावसाने उसंत घेतल्याने सर्वच राजकीय पक्षासह मतदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सकाळ पासूनच मतदान केंद्राबाहेर रांग लागल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीला सकाळपासूनच संथ गतीने मतदान सुरू होते. ही परिस्थिती सर्वच मतदारसंघात पाहावयास मिळाली. संध्याकाळी ४ नंतर मात्र मतदार घराबाहेर पडले. त्यामुळे शेवटच्या दोन तासात मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारनंतर निरुत्साहाचे उत्साहात रूपांतर झाल्याचे चित्र होते. काही  मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रात बिघाड झाले, मात्र तातडीने त्या बदलण्यात आल्या. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सोडण्यासाठी अनेक उमेदवारांनी वाहनाची सोय करण्यात आली होती. 

बोगस मतदान

डोंबिवली येथे दोन मतदारांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे समोर आले आहे. मदन शर्मा या मतदाराचे साऊथ इंडियन शाळेत मतदान होते. शर्मा मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा संतप्त होत शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारून पुन्हा मतदान करण्याची संधी देण्याची विनंती केली. परंतु त्यांची विनंती फेटाळून लावण्यात आली. तसेच बोगस मतदान झाल्याच्या यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनीही तक्रार घेतली नसल्याची माहिती शर्मा यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीतही शर्मा यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका महिलेच्या नावावरही बोगस मतदान झाले, मात्र त्या महिलेने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

नावांचा घोळ

प्रत्येक निवडणुकीत मतदार यादीत नावांचा घोळ होत असतो. यावेळीही हा घोळ दिसुन आला. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. मतदार यादीत नाव नसणे, नाव आडनावात बदल अश्या अनेक चूक होत्या. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. राजकीय पक्षांकडून लावण्यात आलेल्या बुथवर नावे शोधण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती.