कल्याण पश्चिमच्या विकासासाठी २३३ कोटींचा निधी आणल्याचा आ. नरेद्र पवार यांचा दावा

कल्याण पश्चिमच्या विकासासाठी २३३ कोटींचा निधी आणल्याचा आ. नरेद्र पवार यांचा दावा

कल्याण (प्रतिनिधी) : 
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधा तसेच नागरी कामे करण्यासाठी तब्बल २३३ कोटींचा निधी उपलब्ध करून आणल्याचा दावा आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. पक्षाने पुन्हा संधी दिल्यास शहरातील प्रलंबित व प्रस्तावित विकास कामे पूर्ण करण्यासाठी ‘जनसेवक’ म्हणून आपण सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आमदाराचा लेखाजोखा या वार्तालाप कार्यक्रमात पवार यांनी पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देताना ते बोलत होते.

यावेळी आ. पवार यांनी आपण गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या कामासाठी विरोधी पक्षात असताना आंदोलन केले. त्यासाठी पाच दिवस जेलमध्येही राहिलो. आमदार झाल्यावर या कामासाठी शासनाकडून निधींची तरतूद करून घेत ते काम मार्गी लावले. आधारवाडी डम्पिंग बंद करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून अधिवेशनातही आवाज उठवला. याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी ११४ कोटींचे अनुदान दिले. तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मात्र विद्यमान आयुक्त गोविंद बोडके यांनी या कामांना अपेक्षित अशी गती दिली नसल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिलेली १५ सप्टेंबरची डेडलाईन उलटल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आ. पवार म्हणाले. 

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीची प्रमुख समस्या दूर करण्यासाठी मेट्रो आणण्याची आपण मागणी केली. या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात झाले असून मेट्रोचा फायदा संपूर्ण कल्याण परिसराला होण्यासाठी दुर्गाडी किल्ला ते शहाड अशा नवीन हायब्रीड मेट्रोला देखील मंजुरी मिळवल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजी आणि विकासासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून शेष पहिल्या टप्प्यात १ कोटी ७९ लाखाचे काम मंजूर करून पूर्ण केले आहे. टिटवाळा विकासासाठी २.१५ कोटीचा निधी उपलब्ध करू दिला. कल्याणमध्ये रोझाली, नानासाहेब धर्माधिकारी बोटोनिकल गार्डन आणि वृंदावन येथे १२ कोटींच्या विशेष निधीतून उद्याने विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगत आ. पवार यांनी आपण केलेल्या कामांची माहिती दिली. त्याचप्रमाणे गौरीपाडा, आधारवाडी जेल येथील तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले. मराठवाडा भागात जलशिवार योजना आणि सामुदायिक विवाह सोहळा अशी पक्षाने सोपविलेली अनेक कामेही पार पडल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष आनंद  मोरे यांनी आ. पवार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सूत्रसंचालन खजिनदार सुचिता करमरकर यांनी तर सचिव विष्णूकुमार चौधरी यांनी मान्यवरांसह उपस्थितांचे आभार मानले मानले.