जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारला दिले कोणते आव्हान?

जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारला दिले कोणते आव्हान?

ठाणे (प्रतिनिधी) : 
महाराष्ट्रातील किल्ल्यांचे बाजारीकरण करण्याची योजना सरकारने आखली आहे. ज्या २५ किल्ल्यांचे रिसॉर्टमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे त्या किल्ल्यांचा आणि मराठ्यांच्या इतिहासाचा काही सबंध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक किल्ले हे बौद्ध आणि जैन शासकांच्या काळातील आहेत. या किल्ल्यांवरील स्थापत्य कला त्याची साक्ष देत आहेत. येथील दगड त्या पर्वातील इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. असे असतानाही जर हे सरकार सदर किल्ल्यांचे बाजारीकरण करीत असेल तर त्यांनी हे पुरावे खोटे असल्याचे जाहीर करावे, अन्यथा माफी मागावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला दिले आहे.

एमटीडीसीने राज्यातल्या एकूण २५ किल्ल्यांची यादी तयार केली आहे. ही यादी नव्या प्रस्तावासह मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ६० वर्षे ते ९० वर्षे अशा भाडे कराराने हे किल्ले खासगी हॉटेल्सना देण्यात येणार आहेत. त्याविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर मराठ्यांचा, शिवरायांचा सबंध नसल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. त्याशिवाय, या सरकारने जाधवरावांच्या गढीचा संदर्भ दिला आहे. ही गढी त्यांची खासगी मालमत्ता होती. जाधवराव कुटुंबाच्या या गढीला आग लागली. त्यानंतर हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी दादा जाधवराव व त्यांच्या सर्व परिवाराशी चर्चा करुन या घराचे रुपांतर रिसॉर्टमध्ये केले.

साल्हेरचा किल्ला, कोरीगड किल्ला, पारोळ किल्ला, घोडबंदर किल्ला, कंधार, नगरधन किल्ला यासारखे २५ किल्ल्यांवर रिसॉर्ट आणि हॉटेल्स बांधण्यात येणार आहेत. मात्र, या किल्ल्यांचा इतिहासही दैदीप्यमान आहे. साल्हेर, कोरीगड या किल्ल्यांना शिवरायांच्या पराक्रमाची झालर आहे. साल्हेरच्या लढाईत पहिल्यांदाच शिवरायांच्या मावळ्यांनी आपला नेहमीचा गनिमी कावा न वापरता मराठ्यांनी साल्हेरच्या पायथ्याशी उघड्या मैदानात मुघलांना अंगावर घेतलं होतं. 

लोणावळ्याचा कोरीगड देखील शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला होता. कोकण आणि घाट यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा होता. आज जळगाव जिल्ह्यात असलेला पारोळा किल्ल्यातच १८५७ च्या पहिल्या ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या झालेल्या बंडातील नायिका असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला होता. पोर्तुगीजांनी १५३० मध्ये बांधलेला घोडबंदरच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी आक्रमण केले होते. पण चिमाजीअप्पा ह्यांनी तो पुढे जिंकला. कंधार, नगरधन किल्ल्यांना १२०० ते १७०० वर्षांचा इतिहास आहे. येथील स्थापत्य कलेचा अभ्यास केल्यास हे किल्ले म्हणजे बौद्ध आणि जैन शासकांनी बांधलेले असल्याचे दिसत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही असे म्हणणारे सरकार इतिहासाशी बेइमानी कसे करू शकते? मराठी जणांनी दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करीत आहे. त्यामुळे या सरकारने आमची अस्मिता असणारे हे किल्ले जतन करावेत. एकतर पुरावे खोटे असल्याचे जाहीर करा, अन्यथा महाराष्ट्राची जाहीर माफी मागा, असे आव्हान आ. आव्हाड यांनी सरकारला दिले आहे.