निवडणूक प्रचारात कन्हैय्या कुमार जितेंद्र आव्हाडांबद्दल काय म्हणाले?

निवडणूक प्रचारात कन्हैय्या कुमार जितेंद्र आव्हाडांबद्दल काय म्हणाले?

ठाणे (प्रतिनिधी) : 
राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलो आहे. कारण, जितेंद्र आव्हाड हे फॅसीझम विरोधातील आपल्या लढ्यावर तसेच पुरोगामी विचारधारेवर ठाम आहेत. मला विश्वास आहे की ते आपल्या विचारधारेशी प्रतारणा करुन भाजपमध्ये अजिबात जाणार नाहीत, म्हणूनच मी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी आल्याचे वक्तव्य फॅसीझमविरोधी विचारधारेतील लढवय्ये कन्हैया कुमार यांनी मुंब्रा-कौसा येथे आव्हाड यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना केले.

मुंब्रा-कौसा येथील ए.ई. काळसेकर डिग्री कॉलेज, एम.एस. कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड बीएमएस, सिम्बायोसिस कॉलेज येथे कन्हैया कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शानू पठाण, शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड सेक्युलर विचारधारेवर ठाम आहेत. पक्ष तरी कधी कम्युनल झाला तरी पक्षाविरोधात जाण्याची त्यांची हिम्मत आहे. आव्हाड हे कधीच ईडी सीबीआयच्या  नोटीसला घाबरत नाहीत. मृत्यूला घाबरत नाहीत. त्यांना आरएसएस- मोदींना हरवायचे आहे. जातीयवादी-धर्मांध विचारधारेचा पराभव करायचा आहे. आव्हाड यांच्या या वैचारीक हिमतीला दाद देण्यासाठी आणि त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यासाठी मी येथे आल्याचे ते म्हणाले. धर्माच्या नावाखाली माणसांना मारणार्‍या लोकांच्या विरोधात आणि लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कन्हैया कुमार यांनी यावेळी केले.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुन्यांच्या हिटलिस्टरवर  डॉ. आव्हाड होते; तरीही ते  डगमगले नाहीत. जनतेच्या हितासाठी लढणार्‍या जितेंद्र आव्हाड यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी आपल्या पालकांना सांगा, शेजार्‍यांना सांगा, घराघरात सांगा, असे आवाहनही कन्हैया कुमार यांनी या विद्यार्थ्यांना केले. यावेळी कन्हैया कुमार यांनी ‘आझादीचा तराणा’ गायला. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.