उर्जामंत्र्यांच्या आदेशाचे काय झाले? ‘बत्ती गुल’ने टिटवाळावासी संतप्त!

उर्जामंत्र्यांच्या आदेशाचे काय झाले? ‘बत्ती गुल’ने टिटवाळावासी संतप्त!

टिटवाळा (प्रतिनिधी) : कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक एकप्रकारे आपल्या घरात बंदिस्त झाले असतानाच गेल्या काही दिवसापासून टिटवाळा शहर आणि आसपासच्या भागात विजेने लपंडाव मांडला आहे. दररोज तासनतास वीज जात असल्याने टिटवाळावासी संतप्त झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात विजेचा अखंड पुरवठा करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले असतानाही शहरात ‘बत्ती गुल’ होत असल्याने त्यांच्या आदेशाचे काय झाले, असा सवाल नागरिक करीत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सतत वीज जात असल्याने शहरातील नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यावर बंधने असल्याने नागरिक आपल्या घरांमध्ये बंदिस्त झाले आहेत. माजी उपमहापौर तथा मांडा पूर्वच्या नगरसेविका उपेक्षा शक्तीवान भोईर यांनी येथील महावितरणच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडत नागरिकांच्या संतापाला वाट करून दिली. सोमवारी उपेक्षा भोईर यांनी स्वतः महावितरणच्या कार्यालयात गेल्या तेथील महावितरणचे उपअभियंता महाजन कार्यालयात गैरहजर होते. त्यांचा मोबाईलही बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या भोईर यांनी घरात अडकून पडलेल्या नागरिकांचे विजेअभावी होणारे हाल समजावेत म्हणून महावितरणच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनाही कार्यालयातच थांबवून ठेवले. त्या स्वत:ही यावेळी वीज येईपर्यंत महावितरणच्या कार्यालयबाहेरच थांबल्या. त्यांनी महावितरण अभियंता अग्रवाल यांना, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विशेष कार्य अधिकारी  सावडतकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून महावितरणच्या समस्यांबाबत तक्रार नोंदवली.

दिवसातून पाच-पाच वेळा वीज जाणे, तासनतास वीज गायब असणे, महावितरणच्या स्थानिक कार्यालयात दूरध्वनी केल्यास दूरध्वनी बंद करून ठेवणे वा समाधानकारक उत्तरे न मिळणे यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. कार्यालयातील कर्मचारीही बेफिकीरपणे वागत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.