‘संत तुकारामांच्या हत्येचे गूढ’ शॉर्टफिल्म तयार करताना...

‘संत तुकारामांच्या हत्येचे गूढ’ शॉर्टफिल्म तयार करताना...

महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला महाराष्ट्रातील संतांनी चालविलेल्या समतेच्या, जागृतीच्या, बहुजन समाजाला धार्मिक गुलामगिरीमुक्त करू पाहणाऱ्या आंदोलनाची नोंद घ्यावी लागली. महाराष्ट्रातील बहुतेक संत वारकरी संप्रदायाचे पुरस्कर्ते होते. वारकरी संप्रदायाचा पाया संत नामदेवांनी रचला, तर त्यावर कळस चढवण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ ही संत नामदेवांची भूमिका, तर ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू’ ही संत तुकारामांची धारणा होती. वारकरी संप्रदायात सर्वच जातीधर्माचे संत होवून गेले. तिथे जातीआधारित भेदभाव नव्हता. धर्माच्या नावावर होणारी बहुजन समाजाची लुट, समाजावर लादली जाणारी मानसिक गुलामी, जातीआधारित शोषण व्यवस्था आदींच्या विरोधात वारकरी संप्रदायातील संतांनी आवाज उठवला- आंदोलन उभे केले. हजारो वर्षांच्या शोषणाधारित धर्मव्यवस्थेला आव्हान दिले. या क्रांतीच्या विरोधात प्रतीक्रांतीही झाली. संतांचे ‘मुक्ती आंदोलन’ पुढील पिढ्यांपुढे ‘भक्ती आंदोलन’ म्हणून मांडले गेले. बुवाबाजी, चमत्कारांना विरोध करणाऱ्या संतांच्या नावावर चमत्कार चिटकवले व खपवले गेले.

वारकरी संप्रदायाने उभारलेल्या या आंदोलनातील सर्वात महत्वाचे व अग्रस्थानी नाव होते ते संत तुकाराम महाराजांचे. आपल्या अभंगांच्या माध्यमातून, कीर्तनातून लोकजागृतीची मशाल तुकाराम महाराजांनी जनसामान्यांच्या हातात दिली. ही अभंगांची मशाल महाराष्ट्रभर फिरत राहिली, अंधारात चाचपडणाऱ्यांना प्रकाश देत राहिली. हा प्रकाश आणखी लख्ख होत गेला तर आपण उघडे पडू, प्रसंगी जळून राख होवू या भीतीने मंबाजी आणि कंपनीने तुकाराम महाराजांच्या विरोधात मोर्चा उघडला. तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून मांडलेला वैज्ञानिक, तार्किक, बुद्धिवादी, समतेच्या विचारांमुळे आपल्या व्यवस्थेचा डोलारा कोलमडून जाईल या भीतीने तुकाराम महाराजांना संपवण्यापर्यंत त्यांनी हिंम्मत केली. आजही (म्हणजे २१व्या शतकात) आपण लोकांना ही गोष्ट सांगतो, तेव्हा लोक मान्य करायला तयार होत नाहीत. 

आयुष्यभर आपल्या अभंगातून चमत्कारांना विरोध करणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा मृत्यू एका चमत्काराने व्हावा ही शोकांतिका की, संत तुकाराम महाराजांचा केलेला खून पचवण्यासाठी केलेले षडयंत्र? या प्रश्नाचा भुंगा जेव्हा डोक्याचा कीस पडत होता तेव्हा या विषयावरची अनेक पुस्तके वारंवार वाचली. तुकाराम महाराजांची गाथा वाचली आणि या षडयंत्रामागचे धर्मकारण, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिकिकरण समजले आणि हा विषय आजच्या पिढीच्या हातात असलेल्या ‘माध्यमा’तून पुढे आणायचे ठरवले. त्यासाठी एक शॉर्टफिल्म पद्धतीची स्क्रिप्ट लिहून तुकाराम महाराजांच्या अभंगांचेच संदर्भ देत त्यांचा मृत्यू कसा नैसर्गिक नव्हता, हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी तुकाराम महाराजांच्या नावावर खपवले जाणारे आणि त्यांच्या Thought Process पेक्षा पूर्णपणे भिन्न असणारे अभंग निवडत, गणितातील एखादे समीकरण सोडवावे तसा या ‘वैकुंठगमनाचा’ कथित गुंता सोडवला. त्यासाठी माणसांची, पैशाची जुळवाजुळव करणे ही तारेवरचीच कसरत होती. कारण अशा विषयावर काम करताना एक ‘धार्मिक दहशत’ आपल्याला पुढे येऊ देत नाही. परंतु समविचारी मित्रांमुळे ते सोप्पे झाले. लोकेशनचा शोध हाही एक महत्वाचा भाग होता. व्हिडीओ बनवताना इंदायणीच्या नदीकाठचा लुक द्यायचा आमचा विचार होता. त्यासाठी कल्याण जवळच असलेल्या टिटवाळा येथे आम्हा तसे लोकेशन मिळाले. सकाळी ३.३०  वाजता आम्ही टिटवाळा येथील काळू नदीच्या किनारी रुंदे गावाजवळ निश्चित केलेल्या लोकेशनच्या ठिकाणी पोहोचून भल्या पहाटेच्या फिलमध्ये शुट पूर्ण केले.

प्रत्यक्षात ही शॉर्टफिल्म रिलीज करताना एक भिती मनात होतीच आणि ती भीती खरी ठरवणाऱ्या, अनेक शिव्याशाप देणाऱ्या कमेंट, पोलीस कम्प्लेंटच्या धमक्या आम्हाला आल्या, अजूनही येतात. पण दुसऱ्या बाजूला अनेक मातब्बर मंडळीनी आमच्या या कामाचे कौतुकही केले. कित्येकांनी हे काम पुढे सुरु ठेवण्यासाठी आवर्जून शुभेच्छाही दिल्या. शॉर्टफिल्म रिलीज करण्यासाठी आम्ही १४ एप्रिल ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची तारीख निवडली. यासाठी सुरु केलेल्या यु ट्यूब चॅनेलला आम्ही The Truth Finder हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधनाचेच संदर्भ असलेले नाव दिले आणि ही पहिलीच शॉर्टफिल्म- सत्य सांगताना न घाबरता, न डगमगता, लोकमत हे बहुमत असले तरी ते सत्य असेलच असे नाही, हे सांगणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा बनवली याचा आम्हाला किती आनंद झाला हे शब्दात सांगता येणार नाही. 

परिवर्तनाचे काम करणाऱ्या, क्रांतीची भाषा बोलणाऱ्या चळवळींनी आता काळानुसार नव्या पिढीशी संवाद साधण्यासाठी तिची ऑडिओ-व्हिझ्युअल भाषा शिकली पाहिजे. त्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास पुढे आणला पाहिजे. याच भूमिकेतून Murder mystery of Sant Tukaram हा आम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न होता. आपण ही शॉर्टफिल्म पाहिली नसल्यास https://youtu.be/vumSq6lYNHQ  या  लिंकवर जाऊन ती जरूर पाहावी व आवडल्यास इतरांनाही पाहायला सांगावी. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवाव्यात जेणेकरून पुढची वाट सोपी होईल. आपल्या शुभेच्छांनी आम्हाला दहा हत्तींचे बळ मिळेल. शेवटी संत तुकाराम महाराजांच्याच अभंगाचाच आधार घेतो...

सत्य असत्याशी मन केले  ग्वाही
मानियेले नाही बहुमता

 

लेखक : प्रा. गंगाधर सोळंके, औरंगाबाद.