शिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार ? 

शिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार ? 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर निवडणूक लढवत असल्याने लवकरच त्यांच्या जागी नवीन शहरप्रमुखाची निवड होण्याचे संकेत मिळत आहेत. या पदासाठी तीन आजीमाजी नगरसेवकांसह आणखी एक पदाधिकारी इच्छुक असून लवकरच त्यापैकी एकाची शहरप्रमुखपदी वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत.

कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीची उमेदवारीसाठी शिवसेनेतून तब्बल ११ पदाधिकारी इच्छुक होते. भाजपच्या कोट्यातील हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतल्याने येथून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली होती. दरम्यान, यापूर्वी २००९ मध्ये युती असताना अंतर्गत गटबाजीमुळे तर आणि २०१४ मध्ये सेना-भाजपने स्वतंत्रपणे विधानसभा लढल्याने या मतदारसंघात प्राबल्य असूनही सेनेच्या उमेदवारांना दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. यंदा कल्याणचे विद्यमान शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांना कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आमदारकीच्या उर्वरित इच्छुकांना सेनेने भोईर यांना निवडून आणण्याची ताकीद दिली आहे. त्यासाठीच काही इच्छुकांना पक्षीय जबाबदारी सोपवून पक्षनेतृत्वाने कामाला जुंपले आहे. पूर्व-पश्चिमचे विधानसभा संघटक अरविंद मोरे यांना उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली तर भोईर यांच्या जागी नवीन शहरप्रमुख नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शहरप्रमुख पदासाठी प्रामुख्याने विद्यमान नगरसेवक सचिन बासरे आणि माजी नगरसेवक तथा रवी पाटील यांची नावे स्पर्धेत आहेत. त्यातही पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर यांचेही नाव शहरप्रमुख पदासाठी घेतले जात असले तरी त्याला दुजोरा मिळू शकला नाही. विभागप्रमुख बाळा परब हेही शहरप्रमुख पदासाठी इच्छुक असून त्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे समजते. निवडणूक काळातच नव्या शहरप्रमुखपदाची घोषणा होण्याचे संकेत मिळत आहेत.