'वन मित्र' सांगणार वन्य जीवांच्या संरक्षणाचे तंत्र

'वन मित्र' सांगणार वन्य जीवांच्या संरक्षणाचे तंत्र

मुंबई (प्रतिनिधी) :

तुम्ही वन विभागाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊ इच्छिता? तुम्हाला वन्य  जीवांविषयी  अधिक माहिती जाणून घ्यायचीय, तुम्हाला वनांच्या  जतन संवर्धनात  सहभागी व्हायचेय, पण ते कसे करता येईल हे जर ठाऊक नसेल तर आता वन विभागाचा 'वन मित्र' तुम्हाला या कामात मदत करणार आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन विभागाच्या ‘वन मित्र’ या किऑस्क’चे उद्घाटन करण्यात आले. वन विभागाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत व सुलभ प्रकारे पोहचाव्यात याकरिता 'वनमित्र’ किऑस्क विकसित करण्यात आले आहे.

'वनमित्र'च्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती, हरित सेनेची सदस्य होण्याची सुविधा, वृक्षारोपणासंदर्भात तांत्रिक  मार्गदर्शन उपलब्ध होईल. यावर  नागरिकांना सूचना मांडता येतील. वन मित्र तुम्हाला मान्यवरांचे मार्गदर्शनही ऐकवू  शकेल.  वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाईनवरून २४x७  वन विभागाशी  थेट संपर्कात राहण्याची सुविधा हा वन मित्र सर्वाना देणार आहे.

हा वनमित्र किऑस्क सरकारी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे  या सारख्या गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात येईल, जेणेकरून वनविभागाशी नागरिकांना संवाद साधणे सुलभ होईल अशीही माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.