हद्द न बघता ‘हेल्पिंग हँड’ ची गरजूंना मदत

हद्द न बघता ‘हेल्पिंग हँड’ ची गरजूंना मदत

कल्याण (प्रतिनिधी) :
कोविड १९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबांना जीवनावश्यक चीजवस्तूंची मदत करण्यासाठी प्रभाग, शहर अशी कोणतीही हद्द न पाहता कल्याण पूर्वेतील हेल्पिंग हँड चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेने पुढाकार आहे. 

गरजू कुटुंबांना विविध वस्तूंची मदत करण्यात आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी आमदार, इतर राजकीय इच्छुकांसह सामाजिक संस्था, व्यावसायिक संस्था, धनाढ्य दानशूर व्यक्तीही नागरिकांना मदत करण्यास पुढे सरसावल्या आहेत. अशातच कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील विकी पारडे या युवकाने स्थापन केलेल्या हेल्पिंग हँड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. दरम्यान, कोविड१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून विनारोजगार घरीच अडकून पडलेल्या गरीब कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला आहे. जेमतेम क्षमता असूनही हेल्पिंग हँडने कल्याण, डोंबिवली, कल्याण पूर्व, आंबिवली, अंबरनाथ अशा ठिकाणच्या ज्या ज्या गरजू कुटुंबांची जशी माहिती मिळेल तसे त्यांना जमेल ती मदत पोहोचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. 

प्रभाग, शहर अशी कोणतीही हद्द न बघता ज्यांना खरोखर गरज आहे अशा गरीब कुटुंबांना आम्ही संस्थेच्या वतीने जमेल ती अल्पस्वल्प मदत करीत असल्याची प्रतिक्रिया संस्थचे अध्यक्ष पारडे यांनी सांगितले आहे.