विनानंबरप्लेट वाहने धावतात कल्याण-डोंबिवलीत !

विनानंबरप्लेट वाहने धावतात कल्याण-डोंबिवलीत !

कल्याण (प्रतिनिधी) :
अनेक वाहने, विशेषत: दुचाकी वाहने विनानंबरप्लेट कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर खुलेआम धावताना दिसून येत आहेत. गंभीर बाब म्हणजे समाजविघातक प्रवृत्त्तीच्या इसमांकडून अशा विनानंबर प्लेट वाहने हाकण्याची दाट शक्यता असून अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे विनानंबरप्लेट दुचाकी चालविणाऱ्या एका गुन्हेगाराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून नुकतीच अटक करण्यात आल्याची घटना शहरात घडली होती. या पार्श्वभूमीवर विनानंबरप्लेट वाहने हाकणाऱ्यां विरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलीस शाखेकडून कठोर कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नियमानुसार वाहनांना फँन्सी नंबरप्लेट लावता येत नसतानाही अशा प्रकारच्या फँन्सी नंबरप्लेट लावून असंख्य वाहने कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर धावत आहेत. अशातच कल्याण डोंबिवली शहरात असंख्य वाहने, त्यातही दुचाकी वाहने विनानंबरप्लेट रस्त्यांवर धावतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. यातील काही वाहनांना पुढे-मागे दोन्ही बाजूला नंबरप्लेट नसतात तर काही वाहनांना एका बाजूला नंबरप्लेट असते तर दुसऱ्या बाजूला नंबरप्लेटच लावलेली नसते. अनेकदा कुमारवयीन अथवा तरुणांकडून अशा प्रकारे नंबरप्लेट वाहने हाकली जातात. शहरात मुख्य रस्त्यांवर चौकांमध्ये वाहतूक पोलीस व वाहतूक नियंत्रित करणारे स्वयंसेवक वाहतूक  नियंत्रित करताना दिसत असले तरी वाहतूक कोंडीमुळे अशा विनानंबरप्लेट वाहनांवर कारवाई करणे त्यांना शक्य होत नाही. विशेष करून वाहतूक पोलिसांना चकवा देत, तसेच  शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून ही विनानंबरप्लेट वाहने हाकली जातात. अशा विनानंबरप्लेट वाहनांकडून एखादा अपघात झाल्यास नंबरप्लेट नसलेल्या या वाहनांचा शोध घेणेही कठीण होते. 

यासंदर्भात जागरूक नागरिकांकडून अशा विनानंबरप्लेट वाहनांवर कारवाई करण्याचे आग्रही मत व्यक्त केले जात आहे. ‘नो पार्किंग’ परिसरात उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करताना अशा विनानंबरप्लेट वाहने शोधून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी सूचना एका जागरूक नागरिकाने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे शासकीय-निमशासकीय कार्यालये व खाजगी इमारतींना विनानंबरप्लेट वाहनांना त्यांच्या आवारात प्रवेश न देण्याबाबत सूचना करता येऊ शकते. आरटीओ आणि वाहतूक पोलीस शाखेकडून अशी विनानंबरप्लेट  वाहने शोधून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.