रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना मार्गदर्शन

रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सायबर सुरक्षेविषयी महिलांना मार्गदर्शन

रत्नागिरी (प्रतिनिधी) :
'प्रज्वला' योजनेअंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे महिलांसाठी आयोजित विशेष कार्यशाळेत रत्नागिरी सायबर युनिटच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील यांनी तर सिंधुदुर्गमध्ये सायबर युनिटच्या सहपोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी 'सायबर सुरक्षा' या विषयावर मार्गदर्शन केले.

फोटोमध्ये छेडछाड करून दुरूपयोग, चित्रफित, फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक यांसारखे वाढत असलेले प्रकार टाळण्यासाठी महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी रत्नागिरी येथे केले.

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील म्हणाल्या फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये अथवा स्वीकारू नये, सोशल मीडिया वापरताना त्यात असलेल्या प्रायव्हसी सेटिंग्सबद्दल जाणून घेऊन त्याचा योग्य वापर करावा. संपर्क, पत्ता तसेच इतर वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर अपलोड करणे टाळावे आणि व्हॉट्सॲपवर डीपी, स्टेटस ठेवताना काळजी घ्यावी. तसेच फिशिंग आणि विशिंग या दोन वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आपला पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेला ईमेल उघडू नका आणि प्रलोभनांच्या ईमेलना बळी पडू नका, असा सल्ला सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात श्रीमती कुलकर्णी यांनी दिला.

सायबर स्पेसमध्ये आपल्या नागरिकांचे, व्यावसायिक संस्थांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर नेहमीच तत्पर असेल आणि त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करेल. राज्यात असे जनजागृतीचे अनेक कार्यक्रम यापुढेही होत राहतील, असे पोलीस उपनिरीक्षक नितीन रणदिवे यांनी याप्रसंगी सांगितले.

राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे व सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने प्रज्वला उपक्रमाच्या माध्यमातून या महिलांसाठी सायबर सुरक्षेविषयी राज्यभर कार्यशाळा घेण्यात येत आहेत. यासंबंधी माहिती देताना महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर म्हणाल्या की, ऑनलाईन जगात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग आणि महाराष्ट्र सायबर यांनी हाती घेतलेली सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम सर्वच स्तरांतील महिलांना अत्यंत फायद्याची ठरणार आहे.