महिलांनी सुरु केले महिलांसाठी अद्ययावत रुग्णालय

महिलांनी सुरु केले महिलांसाठी अद्ययावत रुग्णालय

ठाणे (प्रतिनिधी) : मुंब्रा-शिळफाटा येथे महिला डॉक्टरांनी पुढाकार घेत फक्त महिलांसाठी क्वीन्स केअर नावाचे अद्ययावत रुग्णालय सुरु केले आहे. या रुग्णालयाचा सर्व कारभार महिलाच सांभाळणार आहेत. अगदी सुरक्षा रक्षकांपासून वैद्यकीय अधिकार्‍यांपर्यंत सर्वच यंत्रणा महिला चालविणार आहेत. स्वातंत्र्य दिनी उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती  रुग्णालयाच्या संचालिका आफ्रीन सौदागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिळ गावात अमारा मेडोज येथे हे रुग्णालय सुरु करण्यात आलेले आहे. या रुग्णालयासंदर्भात डॉ. आफ्रीन सौदागर यांनी ही माहिती दिली.

यावेळी ठाणे परिवहन सेवेचे सदस्य शमीम खान, शकील सिद्दीकी यांच्यासह अन्य डॉक्टर उपस्थित होते. डॉ. सौदागर यांनी सांगितले की, सबंध महाराष्ट्रात फक्त महिलांसाठीचे हे पहिले  रूग्णालय असल्याची शक्यता आहे. या रुग्णालयामध्ये वैद्यकीय कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, वॉर्ड गर्ल्स, सुरक्षा रक्षक अशी सर्व यंत्रणा महिलांच्या हाती असणार आहे. या रुग्णालयामध्ये २४ तास एमडी डॉक्टर तैनात असणार आहेत. या रुग्णालयामध्ये अद्ययाववत एनआयसीयू असणार असून दक्षिण आशियातील हे पहिले एनआयसीयू असणार आहे की ज्यामध्ये पांडा वॉर्मर असणार आहे. इनबिल्ट ईसीजी अशी सर्व वैद्यकीय उपकरणे या ठिकाणी तैनात असणार आहेत. या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीसह, बालविकार, कॅन्सर आदी आजारांवर उपचार होणार असून फक्त नवजात अर्भके आणि महिलांनाच या रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी या रुग्णालयाचे अनावरण करण्यात येणार आहे.