'असे आपले ठाणे' पुस्तकाद्वारे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्थानिक इतिहासाचे लेखन 

'असे आपले ठाणे' पुस्तकाद्वारे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्थानिक इतिहासाचे लेखन 

ठाणे (प्रतिनिधी) :
इतिहास माझ्या आवडीचा व अभ्यासाचा विषय असून ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या ठाणे परिसराचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचा मला निश्चितच अभिमान आहे. इतिहासाच्या जाणीवांमुळे संस्कृती टिकते आणि हा वारसा आपण पुढील पिढ्यांकडे देत असतो याची कल्पना असल्याने ठाणे परिसरातील ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवण्यासाठी एका सुसज्ज वस्तू संग्रहालयाची आवश्यकता लक्षात घेऊन त्याच्या निर्मितीसाठी ठाण्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असेपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करीन, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ठाण्याच्या ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये संपन्न झालेल्या श्रीकृपा प्रकाशनच्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित‘असे आपले ठाणे' पुरस्तक प्रकाशन प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. 

याप्रसंगी त्यांच्या समवेत प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, लेखक सदाशिव टेटविलकर, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड, प्रकाशक विश्वनाथ साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नार्वेकर पुढे म्हणाले की, आपल्याकडे इतिहास म्हणजे सर्वसाधारणपणे राजकीय घडामोडी म्हणून पाहिले जाते, मात्र एखाद्या गांवाचा, शहराचाही इतिहास असू शकतो. ठाणे परिसरात अजूनही अनेक ऐतिहासिक खुणा सापडत असल्याचे लक्षात घेऊन उत्खननात सापडणा-या वस्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यात कोकण इतिहास परिषदेला सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

एखाद्या माणसासारखेच शहरालाही व्यक्तिमत्व असते. ठाणे शहराच्या इतिहासाविषयी मोजकी पुस्तके उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे शहराविषयीच्या प्रेमाने प्रचंड मेहनत घेऊन विविध संदर्भ गोळा करीत येथील विविध ऐतिहासिक पैलूंविषयी विस्तृतपणे व वाचनीय शैलीत लेखन केले आहे. भविष्यातील पिढ्यांना इतिहासाविषयी जाणून घेण्यास ते अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला. डॉ. रविंद्र लाड यांनी आपल्या मनोगतात कोकण इतिहास परिषदेचे कार्य विषद करीत ऐतिहासिक ठेवा जतनीकरण करून पुढील पिढ्यांना आपला वारसा कळावा यादृष्टीने काम करण्याची गरज व्यक्त केली.

लेखक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या मनोगतात इतिहासाविषयीचे हे दहावे पुस्तक असून गड, किल्ले, पुरातन वास्तू, वीरगळे यांची अंतरंगात रूजलेली आवड स्वस्थ बसू देत नाही असे सांगत ठाणे शहराविषयीची आपुलकी या पुस्तकातून व्यक्त झाली असून यामध्ये ठाण्यातील वेगवेगळ्या वास्तू, स्थळे आपला इतिहास कथन करताहेत अशा शैलीत पुस्तक लिहिल्याचे सांगितले. कार्यक्रमाला इतिहासप्रेमी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महेंद्र कोंडे यांनी केले.