केडीएमसीची कोरोना काळातही विक्रमी कर वसुली!

केडीएमसीची कोरोना काळातही विक्रमी कर वसुली!

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेने २०२०-२१ या सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ४२७.५० कोटी रुपयांची वसुली केली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी विक्रमी वसूली करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने दि. ३१ मार्च रोजी एका ‍दिवसात तब्बल १०.७८ कोटी रुपयांची वसूली करून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ४२७.५० कोटी रुपयांची विक्रमी वसूली केली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने दि. १५ ऑक्टोबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ या ३ महिन्याचे कालावधीकरीता ७५% व्याज माफीची अभय योजना लागू केली होती. त्यास करदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत कररूपाने सदर कालावधीत २३०.८५ कोटी रुपयांचा  महापालिकेकडे भरणा केला होता. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकीय उद्दीष्ट ४२५ कोटी रुपये इतके असताना मालमत्ता कर संकलन विभागाने एकूण ४२७.५० कोटी रुपये वसूल केले असून ही महापालिकेच्या इतिहासातील मालमत्ता कराची सर्वात जास्त विक्रमी वसूली आहे. गत वर्षापेक्षा तब्बल १३४.४१ कोटीने ही वसुली अधिक आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेकरीता महापालिकेचा बहुतांश कर्मचारी वर्ग गुंतलेला असताना महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे कणखर नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर ‍निर्धारक व संकलक विनय कुळकर्णी व त्यांचा अधिनस्त कर्मचा-यांनी ही वसुली केली आहे. याकरीता महापालिकेने गत वर्षाच्या प्रारंभापासूनच विविध उपाय योजना अंमलात आणल्या असून त्यात विहीत वेळेत ‍बिले जनरेट करून पोहच करणे, कराचा भरणा ऑनलाईन करणेकरीता जनजागृती करणे, डेबिट कार्ड / क्रेडीट कार्ड / युपीआय / बीबीपीएस / गुगल पे / फोन पे / भिम युपीआय / पॉस मशिन / नेट बँकीग इत्यादीद्वारे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच वाणिज्य ‍आस्थापना, ‍निवासी सदनिका व ओपन लँड विकासक यांना जप्तीपूर्व नोटीसा देणे व वाणिज्य आस्थापना सिल करणे आदींचा अंतर्भाव आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या कर्मचारी वर्गाने देखील पाणी देयकांच्या वसूली पोटी रु. ६६.९४ कोटीची वसूली केली आहे. ही वसूली देखील महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली मानली जात आहे . गतवर्षी ही वसूली रु.६१.१० कोटी इतकी होती. कोविड साथीच्या या कठीण परिस्थितीतही महापालिकेच्या करदात्यांनी करांचा भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबाबत महापालिकेकडून करदात्या नागरिकांचे आभार मानण्यात येत  आहेत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातही करदात्यांनी वर्षाच्या प्रारंभापासूनच शक्यतो ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करून महापालिकेस असेच सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.